कोपरगाव: तालुक्यातील कुंभारी शिवारात संध्याकाळी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या एका बिबट्याने मोटर सायकलवरून चाललेल्या शेतमजूर दामू नामदेव मोरे (वय 49) यांच्यावर अचानक झडप घातली. या हल्ल्यात त्यांच्या हाता पायाला जखमा झाल्या. त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, पढेगाव शिवारात आठ दिवसांपासून धूमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहेत. मात्र, बिबट्याची दहशत अजुनही संपलेली नसल्याचे दिसते आहे. कुंभारी शिवारात दुचाकीस्वारावर बिबट्याने हल्ला केला. यात ते किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचार करून सोडून देण्यात आल्याचे सांगितले गेले. मात्र या हल्ल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
काही महिन्यांपासून कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांना, शेतमजुरांना शेती करणे अवघड झाले आहे. शेतात उभे असलेल्या बागांमध्ये शेतमाल तोडण्यासाठी बागवान लोक धजत नाही. गेल्या आठ-दहा दिवसापासून पढेगाव शिवारातही बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात होता.
ग्रामस्थांनी वनविभागाकडे तक्रारी केल्यानंतर आप्पासाहेब शिंदे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला. भक्ष शोधत आलेला बिबट्या सोमवारी रात्री अलगत त्यात अडकला. या बिबट्याला राहुरी येथील वनविभागात व त्यानंतर वनतारा येथे सोडण्यात येणार आहे, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश रोडे, वनरक्षक अमोल किनकर, वनमजूर प्रदीप इंदरखे, अमोल सूर, मामू शेख, सागर इंदरखे, बाळासाहेब वाणी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहा वनसंरक्षक जी.पी. मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रोडे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.