

संगमनेर: नाशिक-पुणे मिनी हायस्पीड रेल्वे व शिर्डी ते शहापूर रेल्वे मार्ग अकोले तालुक्यातून व्हावा, या मागणीसाठी अकोलेकरांनी काल मंगळवारी संगमनेर येथील प्रांत कार्यालयावर विशाल मोर्चा काढला. यात आमदार, सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अकोले कृती समितीच्या वतीने मंगळवारी (दि.16) अकोले ते संगमनेर असा मोर्चा काढला. सर्व पक्षीय कार्यकर्ते व नेते अकोले बाजारतळावर एकत्र आले. तेथून हा मोर्चा संगमनेरात येऊन धडकला. आमदार डॉ.किरण लहामटे, अमित भंगारे हे मोटारसायकलवरून या मोर्चात सहभागी झाले. संगमनेर शहरात अकोले नाका मेन रोडवरून तीणबत्ती चौक मार्गे नवीन नगर रोडवरील प्रांत कार्यालयावर मोर्चा आला. यावेळी अकोलेतूनच रेल्वे गेली पाहिजे, अभी नही तो कभी नही, अशा घोषणांनी संगमनेर शहर दुमदमून गेले होते. या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
यावेळी आमदार किरण लहामटे, आ.सत्यजित तांबे, आ.अमोल खताळ, सीताराम गायकर, डॉ.अजित नवले, मधुकर नवले, बाजीराव दराडे, कैलास वाकचौरे, मारुती मेंगाळ, जालिंदर वाकचौरे, कॉ. कारभारी उगले, साथी विनय सावंत, राजाभाऊ आवसक, डॉ.संदीप कडलग, गिरीजा पिचड, आर पी आयचे विजयराव वाकचौरे, मधुकरराव तळपाडे, सतीश भांगरे, निता आवारी, महेशर नवले, शिवसेना ( उबाठा) तालुकाप्रमुख मच्छिन्द्र धुमाळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे, प्रदीप हासे, चंद्रकांत सरोदे, गणेश कानवडे, हेमंत दराडे, प्रमोद मंडलिक, वसंत मनकर, हेरंब कुलकर्णी, अक्षय आभाळे आदीसह मोठ्या संख्येने अकोलेकर उपस्थित होते.
संगमनेर-अकोले सोबतच: आ. तांबे
रेल्वेच्या मूळ आराखड्यातही नाशिक-पुणे रेल्वे मार्ग हा अकोले-संगमनेर मार्गेच होता. सद्याचे सरकार ही नाशिक-पुणे रेल्वे आता नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर मार्गे पुणे नेत आहे, म्हणजे हा पुण्याहून पुणतांबा असा चुकीचा मार्ग आहे. या पुणे नाशिक रेल्वेचे पाहिले स्वप्न माजी खा.सुरेश कलमाडी यांनी पाहिले होते. स्वातंत्र्य संग्रामात अकोले-संगमनेर बरोबर होतो, तर रेल्वे आंदोलन काय आहे, असेही ते म्हणाले.
लोकप्रतिनिधींना टार्गेट करू नका: आ. लहामटे
मी लोकप्रतीनिधी म्हणून प्रत्येक लढ्यात बरोबर आहे. रेल्वे अकोल्यातून जावी, या लढ्यातही सोबत आहे. मात्र एकीकडे आंदोलनात बोलवायचे व दुसरीकडे लोकप्रतिनिधींनी राजीनामे फेकायची भाषा करायची, हे योग्य नाही. आंदोलनात राजकारण आणायचे नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका व्हायच्या, तेव्हा होतील, मात्र या मोर्चात त्याचा उल्लेख करून लोकप्रतिनिधींना टार्गेट करू नये, असे आमदार किरण लहामटे म्हणाले.
रेल्वे पळविणाऱ्यांची नावे सांगा: कॉ नवले
केंद्रातील भाजपा सरकार हा रेल्वेचा निर्णय घेताना राज्यातील मुख्यमंत्री, त्या विभागातील स्थानिक मंत्र्याला माहिती दिल्याशिवाय निर्णय होऊ शकत नाही. या रेल्वे प्रकल्पात् निम्मा सहभाग राज्य सरकारचा असून सर्व परवाने राज्याचे लागतात. सर्व लोकप्रतिनिधिनी एकत्र येऊन ही रेल्वे पळवणारा कोण आहे, ते जाहीर करावे, अशी भूमिका कॉ. अजित नवले यांनी मांडली.