नगर: अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणेची निवडणूक पूर्वतयारी जोमात सुरु झाली आहे. महापालिका मतदानासाठी जवळपास 345 मतदान केंद्रांची व्यवस्था केली जाणार असून, मतदान केंद्रांची अंतिम यादी 20 डिसेंबरला जाहीर होणार आहे. दरम्यान, पाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तीन तर एका अधिकाऱ्यांकडे दोन प्रभागांची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
अहिल्यानगर महापालिकेचा बिगुल वाजला असून, 3 लाख 9 हजार 7 मतदारांसाठी मतदान केंद्रांची उभारणी सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 800 ते 900 मतदारांसाठी एक मतदान केंद्र ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील मतदारसंख्या विचारात घेता जवळपास 345 मतदान केंद्रांची व्यवस्था केली जाणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या सात अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तीन दिवसांपूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर तीन प्रभागांची जबाबदारी टाकण्यात आली असून, जोडीला तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांची सहाय्यक निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आचारसंहिता कक्ष महापालिकेत
महापालिका निवडणूक अधिकारी यशवंत डांगे यांनी आचारसंहिता कक्षाच्या प्रमुखपदी उपजिल्हाधिकारी सायली सोळंके यांची नियुक्ती केली आहे. त्यांना सहाय्यक म्हणून महापालिकेचे जल अभियंता परिमल निकम, कनिष्ठ अभियंता महेश धाडगे व सिस्टीम मॅनेजर अंबादास साळी या तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आचारसंहिता कक्ष नवीन महापालिका कार्यालयातील सभागृह नेता यांचे दालन या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे.