

बोधेगाव: उत्तर युरोपातील एस्टोनिया देशात आयोजित जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत अहिल्यानगरच्या दिया प्रीतम छाजेड व इशिका अभिजित अडसूळ या दोन भारतीय विद्यार्थिनींनी ऐतिहासिक यश संपादन करत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. जगभरातील 70 देशांतील 2 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मागे टाकत दोघींनी प्रथम क्रमांक पटकावून जागतिक विजेतेपद मिळवले.
भारतात पार पडलेल्या राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत दियाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला होता. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठात झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेतून तिने जागतिक स्पर्धेचे तिकीट मिळवले. इशिका अडसूळ हिनेही राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश केला होता.
एस्टोनिया येथे झालेल्या या जागतिक स्पर्धेत दहा विविध गटांतील सर्व वयोगटांतील स्पर्धक सहभागी झाले होते. अमेरिका, युरोप व आशिया खंडातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने संघ सहभागी झाले असतानाही नावीन्यपूर्ण संकल्पना, अचूक सादरीकरण व आत्मविश्वासाच्या जोरावर दिया व इशिका यांनी सर्व फेऱ्या यशस्वीरीत्या पार करत अंतिम विजेतेपदावर आपले नाव कोरले. दिया छाजेड हिने सांगितले की, भारत हा कृषिप्रधान देश आहे. अन्न निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांचे कष्ट कमी करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेता येईल, याच उद्देशाने हा रोबोट तयार केला. आजोबा, व वडील शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांविषयी विशेष आपुलकी आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल दोघींना मिळून एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले असून, लवकरच सुवर्णपदक देण्यात येणार आहे.
मूळची अहिल्यानगरची असलेली दिया सध्या बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर प्रशालेत इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. तिच्या यशामागे आई शीतल छाजेड, वडील प्रीतम छाजेड, तसेच शिक्षिका आस्मा मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. इशिका अडसूळ हिलाही पालक व शिक्षकांचे भक्कम पाठबळ लाभले आहे. या ऐतिहासिक यशामुळे दोघींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान देणारे हे यश आगामी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
शेतीसाठी रोबोट
या स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरला दियाने विकसित केलेला मोबाईलद्वारे ऑपरेट होणारा शेतीसाठी उपयुक्त रोबोट. हा रोबोट पेरणी, फवारणी व नांगरणी यांसारखी अनेक शेतीकामे एकाच यंत्राद्वारे करू शकतो. तसेच तापमान, हवामानातील बदल व वातावरणातील आर्द्रता मोजण्याची क्षमताही त्यामध्ये आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन श्रमात मोठी बचत होणार आहे.