

जामखेड: नाशिक येथे खोदकाम करताना सोन्याचे मनी सापडले आसुन तुम्ही सर्व मणी आठ लाख रुपयांना विकत घ्या अशी गळ कापड व्यापाऱ्यास आरोपींनी घातली. मात्र प्रसंगावधान राखून व्यापाऱ्याने याची माहिती जामखेड पोलिसांना दिली. यानंतर जामखेड पोलिसांनी खर्डा रोडवर सापाळ रचून बनावट सोने देण्याच्या बहाण्याने आलेल्या आंतरराज्यीय टोळीस जेरबंद केले.
पोलिसांकडून मिळालेली माहिती, अशी की जामखेड शहरातील प्रसिद्ध कापड दुकानदार गणेश महादेव खेत्रे (रा. जामखेड) यांना त्यांच्या कापड दुकामध्ये दि. 28 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपी अशोक मिस्त्री (उत्तमकुमार मोकाराम बागरी) (वय 24, रा.धानसा, ता. भीनमाल, राजस्थान) याने त्याच्यासोबत असलेला आरोपी मोहनलाल बालाजी बागरी (वय 56) यांनी फिर्यादीच्यो क्रिएटीव्ह मेन्स वेअर नावाचे कापड दुकानात येऊन काही कपडे खरेदी करून एका पिवळया धातूच्या माळेतील एक मणी फिर्यादीला देऊन सांगितले की, नाशिक येथे खोदकाम करताना हे आम्हाला मिळून आले.
तुम्ही सोनाराकडे जाऊन खात्री करा व आम्हाला पैशाची गरज असल्याने आठ लाख रुपयांमध्ये आमच्याकड़ील सर्व माल विकत घ्या. आरोपी वेळोवेळी त्यांच्याकडील बनावट सोने फिर्यादीला विकण्यासाठी संपर्क करत होते. गुन्हयातील आरोपींनी दिनांक 15 डिसेंबर रोजी रोजी दुपारी पावणेतीनला जामखेड कडून खर्ड्याकडे जाणाऱ्या रोडवरून रंगोली हॉटेलच्या जवळ थांबून फिर्यादीस ठरलेली रक्कम घेऊन बोलावले होते.
सदर बनावट सोन्याची जामखेड पोलिस स्टेशन हद्दीत विक्री करून फसवणूक होणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत जामखेड पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या बातमीनुसार गुन्हा घडण्यापूर्र्वीच पोलिस निरीक्षक यांच्या आदेशान्वये जामखेड पोलिस स्टेशन येथील पोलिस पथक खर्डा रोड परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्याच वेळी हॉटेल रंगोली या ठिकारणी फिर्यादी, त्यांचा भाऊ व मित्र असे चारचाकी वाहनातून गेल्यानंतर आरोपींनी फिर्यादीस बनावट सोने देवून, पैशाची मागणी केली. त्या वेळी अशोक मिस्त्री (उत्तमकुमार मोकाराम बागरी) व प्रवीणकुमार मोहनलाल बागरी यांनी फिर्यादीस मारहाण करून त्यांचे खिशातील रोख रक्कम तीन हजार रुपये काढून घेतले.
त्या ठिकाणी गोंधळ व आरडाओरड झाल्याचे लक्षात येताच खर्डा रोडवर सापळा रचून पेट्रोलिंग करत असलेले जामखेडचे पोलिस नाईक वाघ, कॉन्स्टेबल देवा पळसे, घोळवे व शेवाळे यांनी तत्काळ जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांचेसोबत असलेला एक आरोपी हा खर्डा बसस्थानकावर होता. पोलिस पथकाने तेथे जाऊन मोहनलाल बालाजी बागरी यास ताब्यात घेतले. गणेश महादेव खेत्रे (वय 32) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या अंगझडतीत फिर्यादीचे काढून घेतलेली रोख रक्कम तीन हजार रुपये पंचनामा करून हस्तगत करण्यात आली. पिवळ्या धातूच्या बनावट सोन्याच्या माळा (अंदाजे वजन 1 किलो) असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून पुढ़ील तपास सहायक पोलिस निरीक्षक वर्षा जाधव या करत आहेत.