

श्रीरामपूर: नायलॉन (चिनी) मांजाचा साठा करणारे व्यावसायिक, दुकानदार यांच्यावर अडीच लाखांचा दंड, तर पतंग उडविणाऱ्यांवर 50 हजारांचा दंड आकारण्याचा निर्णय श्रीरामपूर नगरपरिषदेने घेतला आहे.
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात पतंग उडवणारे नागरिक सर्रास नायलॉन मांजाचा वापर करत आहेत. या मांजामुळे गळा चिरणे, गंभीर जखमा होणे, दुचाकीस्वारांचा मृत्यू आणि पक्ष्यांचा बळी जाणे या घटना घडत असल्याने नायलॉन मांजाचा वापर करून, संग्रह करणारे, विक्री करणारे तसेच या मांजाचा वापर करून पतंग उडवणारे नागरिक यांच्यावर प्रतिबंध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश पारीत केला असून सदर नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवणारे नागरिक निदर्शनास आल्यास अल्पवयीन मुलगा अथवा प्रौढ व्यक्ती किंवा त्यांच्या पालकांवर 50 हजार रुपये दंड आकारण्याचा.
तसेच नायलॉन मांजाचा साठा करणारे व विक्री करताना आढळून आलेल्या व्यावसायिकांवर अथवा दुकानदारावर तब्बल 2 लक्ष 50 हजार रुपयांचा दंड ठोठवण्याबाबत निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत.
सदर नायलॉन मांजाचा वापर, साठा, विक्री करणारे नागरिक, व्यावसायिक यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी श्रीरामपूर नगरपरिषदेने पथक नियुक्त केलेले असून सदर पथकाद्वारे नियमितपणे कारवाई सुरू आहे. सदर पथकास नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवणारी अल्पवयीन मुले, प्रौढ व्यक्ती आढळून आल्यास संबंधितांवर रु.50,000/- तसेच सदर नायलॉन मांजाची विक्री, साठा करताना आढळून आलेल्या नागरिक, दुकानदार, व्यावसायिकांवर सदर नायलॉन मांजा जप्त करून रु.2,50,000/- रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
तरी संबंधित नागरिकांनी नायलॉन मांजाचा साठा, विक्री, वापर करू नये व कारवाईस बळी पडू नये, असे आवाहन श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप व श्रीरामपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष करण जयंत ससाणे यांचेमार्फत करण्यात आले आहे.