

अकोले: नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे अकोल्यातून जावी या मागणीसाठी देवठाण येथे आज सर्वपक्षीय मागणी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हजारो विद्यार्थ्यांनी गावातून रॅली काढून मुख्यमंत्र्यांना आपल्या मागणीचे पत्र पाठवत या मेळाव्याची सुरुवात झाली. रेल्वे आमच्या हक्काची, आमच्या उज्वल भविष्याची या मागणीने यावेळी सबंध देवठाण पंचक्रोशी दुमदुमून गेली होती. देवेंद्र मामा रेल्वे द्या, विखे मामा रेल्वे द्या, किरण मामा रेल्वे द्या, असा आग्रह करणाऱ्या घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या. भव्य मंडप व प्रशस्त व्यवस्थेच्या वातावरणामध्ये ही ऐतिहासिक परिषद देवठाण येथे संपन्न झाली.
देवठाण येथे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच एक सभा घेऊन नाशिक पुणे रेल्वे पूर्वीच्या मार्गानेच होईल व देवठाण येथे स्टेशन देऊनच रेल्वे पुढे जाईल, असे आश्वासन दिले होते. एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जातो.
अर्थसंकल्पात याबाबत बदललेला रूट पुनर्स्थापित करण्याची घोषणा झाली नाही तर पालकमंत्र्यांच्या या घोषणेला अर्थ राहणार नाही. पालकमंत्र्यांचे आश्वासन खरे ठरावे यासाठी त्यांनी युद्धपातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी, तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री यांना भेटून एक फेब्रुवारीपूर्वी याबाबतचा निर्णय करावा. अर्थसंकल्प मांडताना तशी घोषणा दिल्लीमधून होईल यासाठी पूर्ण प्रयत्न करावेत. तसे झाले तरच पालकमंत्र्यांच्या आश्वासनाला अर्थ राहणार आहे, असे झाले नाही तर एक फेब्रुवारीनंतर वर्षभर पुन्हा या मागणीसाठी थांबावे लागेल व एक प्रकारे निवडणुकीसाठी दिलेले हे आश्वासन ठरेल.
असे होऊ नये यासाठी पालकमंत्र्यांनी युद्ध पातळीवर काम करून दिलेले आश्वासन पाळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीसाठी लवकरच बोटा या ठिकाणी 12 तारखेला रास्ता रोको आंदोलन स्थानिक ग्रामस्थांनी आयोजित केले आहे, असे या वेळी सांगण्यात आले.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते कॉम्रेड कारभारी उगले होते. विनय सावंत यांनी सूत्रसंचालन केले. आमदार डॉ. किरण लहामटे, अजित नवले, महेश नवले, जालिंदर वाकचौरे, उत्कर्षा रूपवते, सुधीर अण्णा शेळके, अरुण शेळके, तुळशीराम कातोरे, सदाशिव साबळे, गिरीजा पिचड, सागर शिंदे, संदीप दातखिळे, विजय वाकचौरे आदींनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली.