

जामखेड: रस्त्यावरून दुचाकीने जात असताना हॉर्न वाजविल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुण व त्याच्या मित्रांना मारहाण करून त्यांच्या दुचाकींची कोयत्यासारख्या धारदार हत्याराने तोडफोड केल्याची गंभीर घटना मंगळवारी (दि. 6) रात्री शहरातील बीड कॉर्नर परिसरात घडली. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला.
फिर्यादी प्रसाद दिनकर राजगुरू (वय 23, रा. सुतार गल्ली, जामखेड) हा मंगळवारी रात्री साडेआठ वाजता आपल्या मित्रांसह दुचाकीने बीड कॉर्नर येथून जात होता. यावेळी रस्त्यावरून जाताना प्रसाद राजगुरू याने दुचाकीचा हॉर्न वाजविला.
याच कारणावरून आरोपी सार्थक बळीराम राळेभात, पृथ्वीराज पवार, शिवम कोल्हे, महेश भगवान आजबे, साई प्रदीप जाधव व यश पवार (सर्व रा. जामखेड, पूर्ण नावे काही आरोपींची उपलब्ध नाहीत) यांनी फिर्यादीची दुचाकी अडवली.
तुम्ही आमच्या पानटपरीसमोर हॉर्न का वाजवला, असे म्हणत आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपी पृथ्वीराज पवार याने पानटपरीतून कोयता आणून धमकी दिली, त्यामुळे जीवाच्या भीतीने फिर्यादी व त्याचे मित्र आपापल्या दुचाकी जागेवरच टाकून पळून गेले.
यानंतर आरोपींनी घटनास्थळी उभ्या असलेल्या फिर्यादीची मोटारसायकल (एमएच 16 डीई 0826) तसेच त्याचा मित्र श्याम अंकुश राजगुरू याची मोटारसायकल ( एमएच 16 सीडब्ल्यू 8882) या दोन्ही दुचाकींची हत्याराने तोडफोड केली. या घटनेप्रकरणी प्रसाद दिनकर राजगुरू यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन जामिनावर मुक्त केले.