

संगमनेर: संगमनेर नगरपालिका निवडणुकीनंतर ईव्हीएम मशिन ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही रविवारी (दि.7) दुपारी एक वाजेच्या दरम्यान सुमारे एक तास बंद झाल्याने गोंधळ उडाला. उमेदवार व संगमनेर सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी अधिकाऱ्यांना जाब विचारला. हार्ड डिस्क बदलण्यासाठी सीसीटीव्ही बंद असल्याच्या प्रशासनाच्या खुलाशावर समाधान न झाल्याने पदाधिकारी व अधिकाऱ्यात शाब्दिक बाचाबाची झाली. संतापलेल्या उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी क्रीडा संकुलासमोर ठिय्या दिला. अखेर पोलिसांनी सहा उमेदवारांना स्ट्राँग रूम मध्ये नेत सील व मशिन सुरक्षित असल्याचे दाखवल्यानंतर वातावरण काहीसे शांत झाले.
हार्ड डिक्स बदलण्याच्या आडून काहीतरी वेगळे कारस्थान असल्याचा संशय उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. संगमनेर नगरपालिकेच्या 15 प्रभागातील 27 जागांसाठी 2 डिसेंबरला मतदान झाले. मतमोजणी 21 तारखेला होणार असल्याने ईव्हीएम मशीन भाऊसाहेब थोरात संगमनेर नगरपालिका क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उमेदवार व पदाधिकाऱ्यांना पाहण्यासाठी सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज उमेदवार, पदाधिकारी तेथील सुरक्षेचा आढावा घेतात. रविवारी (दि.7) एक वाजेच्या सुमारास अचानक सीसीटीव्ही बंद असल्याचे निदर्शनास आले. यामुळे उमेदवार व संगमनेर सेवा समितीचे पदाधिकाऱ्यांनी क्रीडा संकुलाकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक समीर बारवकर, नायब तहसीलदार मार्तंड माळवे, अधिकारी व पोलिस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी अरुण उंडे यांचेशी उमेदवारांनी संपर्क साधला. बराच वेळ हा गोंधळ सुरु होता. अखेर पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी सहा उमेदवारांना आतमध्ये नेत ईव्हीएम मशिनचे सील व पेटी सुरक्षित असल्याचे दाखवले. या नंतर हा वाद काहीसा शांत झाला.
सीसीटीव्हीची हार्ड डिस्क बसविण्याचे काम सुरु होते. यामुळे काही काळ वेळ कॅमेरे बंद असले तरी डिस्क बसविण्याच्या कामाचे शुटींग करण्यात आले आहे. उमेदवार, राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगत गैरसमज दूर केला आहे.
समीर बारवकर, पोलिस निरीक्षक
प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप
रविवारी ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेरे एक तास बंद झाल्याचे समजताच विश्वासराव मुर्तडक, किशोर पवार, महेश खटाटे, प्रवीण अभंग, अमित गुंजाळ, सौरभ कासार, सचिन सातपुते, लाला खान पठाण, नूर मोहम्मद शेख, अमजद पठाण, सागर कानकाटे, संदीप लोहे यांना प्रत्यक्ष भेट दिली. त्यावेळी एक तास सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाल्याचे निदर्शनात आले. सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी क्रीडा संकुलाच्या बाहेर बसून प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.
मतमोजणी 3 तारखेला नियोजीत असल्याने हार्ड डिस्कची क्षमता कमी होती. त्यानंतर मतमोजणी 21 तारखेला घोषित झाल्याने पालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन जादा क्षमतेची हार्ड डिस्क टाकण्यात आली. ईव्हीएम मशिन व सील सुरक्षित असल्याचे उमेदवारांना दाखण्यात आले.
मार्तंड माळवे, नायब तहसीलदार
प्रशासनाचा खुलासा
ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेसाठी नगरपालिकेकडून स्ट्राँगरूमभोवती सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. 3 तारखेला होणारी मतमोजणी आता 21 तारखेला होणार आहेे. स्ट्राँग रूमभोवती बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीची हार्ड डिस्क संपत आल्याने ती नव्याने बसविण्याचे काम सुरु होते. त्यामुळे काही वेळ सीसीटीव्ही बंद असले तरी हार्ड डिस्क बसविण्याचे शुटींग सुरु होते असा खुलासा प्रशासनाने केला.
ईव्हीएमच्या जोरावर निवडणूक जिंकल्या जात आहे. संगमनेरमध्ये एक तास सीसीटीव्ही कॅमेरे बंद का? याचे उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे. काही वेगळे करण्याचा दबाव तर प्रशासनावर नव्हता ना, अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्याचे निराकरण होणे गरजेचे आहे.
विश्वासराव मुर्तडक, माजी नगराध्यक्ष