

लोणी: सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि चाऱ्याची वाढती टंचाई लक्षात घेता दुग्धव्यवसायिकांना जनावरांसाठी कमी खर्चात पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर (पायरेन्स) यांच्या वतीने ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत औरंगपूर येथे दुग्धव्यवसायिकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे नुकतेच आयोजन केले होते. यामध्ये हायड्रोपोनिक पद्धतीने मका चारा निर्मिती तसेच गव्हाच्या भुशावर युरिया प्रक्रिया करण्याच्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणाला परिसरातील शेतकरी व दुग्धव्यवसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. उत्तमराव कदम तसेच पायरेन्स संस्थेचे सचिव तथा संचालक डॉ. निलेश बनकर, केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आयोजित केले होते.
प्रशिक्षणामध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या पशुसंवर्धन विभागाचे डॉ. विठ्ठल विखे यांनी हायड्रोपोनिक चारा निर्मितीचे तंत्रज्ञान सविस्तर समजावून सांगितले. मातीचा वापर न करता कमी जागेत आणि अत्यल्प पाण्यात मका बियाण्यापासून अवघ्या सात ते आठ दिवसांत हिरवा चारा तयार करता येतो. यासाठी चांगल्या प्रतीचे मका बियाणे निवडून सुमारे १२ तास पाण्यात भिजवावे. त्यानंतर ओल्या गोणपाटात ठेवून मोड आणावेत. हे मोड आलेले बियाणे प्लास्टिकच्या ट्रेमध्ये पसरून रॅकवर ठेवावे. नियमितपणे फॉगर किंवा तुषार सिंचनाद्वारे हलके पाणी द्यावे. सात ते आठ दिवसांत साधारण २५ ते ३० सेंटीमीटर उंचीचा मुळांसह हिरवा चारा तयार होतो. हा चारा सुक्या चाऱ्यासोबत मिसळून जनावरांना देता येतो.
याशिवाय निकृष्ट दर्जाच्या गव्हाच्या भुशाची पौष्टिकता वाढविण्यासाठी युरिया व गुळाच्या साहाय्याने प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञानही समजावून सांगण्यात आले. या प्रक्रियेमुळे भुशाची पचनक्षमता आणि रुचकरता सुधारण्यास मदत होते. त्यामुळे जनावरे हा चारा अधिक आवडीने खातात. तसेच पशुखाद्यावरील अतिरिक्त खर्च कमी करण्यासाठी उपलब्ध कोरड्या चाऱ्याचा योग्य वापर कसा करावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
दुष्काळी परिस्थितीत जनावरांचे आरोग्य, दूध उत्पादन आणि पोषण टिकवून ठेवण्यासाठी उपलब्ध संसाधनांचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. हिरव्या चाऱ्याची कमतरता असताना हायड्रोपोनिक तंत्रज्ञान आणि भुशावरील प्रक्रिया हे दुग्धव्यवसायिकांसाठी उपयुक्त पर्याय ठरू शकतात. या तंत्रज्ञानामुळे चारा टंचाईच्या काळात जनावरांचे कुपोषण टाळण्यास आणि दुग्धव्यवसायाचा उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते.
यावेळी डॉ. विठ्ठल विखे म्हणाले, “सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाई ही दुग्धव्यवसायिकांसमोरील मोठी समस्या आहे. ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत औरंगपूर येथील शेतकऱ्यांना हायड्रोपोनिक चारा निर्मिती आणि युरिया प्रक्रियेचे तंत्रज्ञान समजावून देऊन त्यांना चारा व्यवस्थापनात स्वावलंबी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कमी पाण्यात आणि मर्यादित खर्चात जनावरांसाठी दर्जेदार चारा उपलब्ध करून देण्यासाठी हे तंत्रज्ञान निश्चितच उपयुक्त ठरेल.”
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून चारा व्यवस्थापनाचे नियोजन करावे आणि दुष्काळी परिस्थितीतही दुग्धव्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवावा, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. कृषी विज्ञान केंद्राच्या या उपक्रमामुळे परिसरातील दुग्धव्यवसायिकांना चारा टंचाईवर मात करण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
घाबरु नका, तंत्रज्ञान वापरा...
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर, पशुसंवर्धन विभाग आणि प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पाणी, चारा, फळबाग आणि पीक व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन होणार आहे. शेतकऱ्यांनी दुष्काळाला घाबरून न जाता योग्य तंत्रज्ञानचा वापर करून यावरती उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांनी केले.