

नगर: सहकारात राजकारण नको याच भूमिकेतून जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही जागांवर निवडणूक लागली. जामखेडमधील जागा बिनविरोध करण्यात यश मिळाले, पण कर्जतमध्ये प्रयत्न अपुरे पडले. पारनेरमधील पराभवाची जबाबदारी माझीच आहे. अध्यक्षपदाच्या उमेदवाराचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेतील अशी स्पष्ट भूमिका भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. विजयी झालेले खासदार नीलेश लंके व सभापती प्रा. राम शिंदे यांचे अभिनंदन करण्याचा मोठेपणाही डॉ. विखे यांनी दाखविला.
जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालानंतर डॉ. विखे यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला. ज्येष्ठ नेते चंद्रशेखर घुले, आमदार आशुतोष काळे, रणजित देशमुख, राजश्री चंद्रशेखर घुले, अनुराधा नागवडे, संगीता वाघ, गणपत सांगळे, संजीवनी शिंदे, वैभव पिचड, सचिन जगताप, दत्ता पानसरे, करण ससाणे हे नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हा बँकेच्या सर्व जागा बिनविरोधाची अपेक्षा होती, तसे प्रयत्नही झाले.
मात्र काही जागांवर निवडणूक झालीच. निवडणुकीच्या प्रचारात कोणीही संयम सोडला नाही, बँकेच्या विश्वासार्हतेला तडा पोहचेल असे आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक कोणीही केली नाही, याबद्दल डॉ. विखे यांनी समाधान व्यक्त केले. पारनेरमध्ये खासदार विरोधात सामान्य कार्यकर्ता अशी लढत झाली. विद्यमान खासदारांविरोधात ग्रामपंचायत सदस्य नसलेल्या साध्या समर्थकाने निवडणूक लढवली. दुर्दैवाने या निवडणुकीत खासदार लंके विजयी झाले, तर राहुल शिंदे यांचा पराभव झाला. या पराभवाचे दुःख आहे. पराभवाची जबाबदारी मी घेतली आहे. पराभूत उमेदवारांनाही बँकेच्या कारभारात विश्वासात घेतले जाईल, अशी ग्वाहीही डॉ. विखे यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी माझ्यासह सर्वच इच्छुक असू शकतात. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, चंद्रशेखर घुले यांच्यासारखे ज्येष्ठ नेते एकत्र येऊन यावर चर्चा करतील. सर्व संचालकांची मते जाणून घेतील. मात्र, अंतिम निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील, अशा शब्दात डॉ. विखे यांनी चेअरमन पदाच्या नावाचा सस्पेन्स कायम ठेवला.
सभापती शिंदेंचा सन्मान ठेवला
बिनविरोधच्या सर्वपक्षीय बैठकीत सभापती प्रा. राम शिंदेही उपस्थित होते. त्यावेळी किती जागा द्यायच्या हे ठरलेले नव्हते. त्यांच्याशी चर्चेनंतर दुसऱ्या दिवशी कळवू, असे सांगण्यात आले होते. मात्र, अपरिहार्य कारणामुळे अपेक्षित मार्ग निघाला नाही. सहकार विकास पॅनलमधील नेत्यांकडे ‘त्या’ जागांवर सक्षम उमेदवार होते. निकालात ते दिसूनही आले आहे. मात्र, सभापतींचा सन्मान ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. जामखेडची जागा बिनविरोध करण्यासाठी आमच्या उमेदवाराने माघार घेतली. कर्जतमध्येही बिनविरोधचे प्रयत्न सुरू होते. मात्र उमेदवार माघार घेण्यास तयार नव्हता. तरीही एक दिवस आणखी भेटला असता तर ती जागाही बिनविरोध केली असती, अशी भूमिका डॉ. विखे यांनी मांडली.
पानसरे, शिंदे ‘सहकार’सोबत
बिनविरोध संचालक झालेले श्रीगोंद्याचे दत्ता पानसरे व अकोल्यातील विजयी संजीवनी शिंदे यांनी सहकार विकास आघाडीचे नेतृत्व स्वीकारले आहे. संजीवनी शिंदे या ज्येष्ठ नेते सीताराम गायकर यांच्या कन्या आहेत. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. दत्ता पानसरे यांच्या बिनविरोधासाठी डॉ. विखे, आ. संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतला होता. दोघांच्या पाठबळाने सहकार विकास आघाडीकडे १८ संचालकांचे बहुमत झाल्याचे विखे पाटील म्हणाले.
जिल्हा बँकेत सहकार विकास मंडळाला सभासदांनी बहुमत दिले आहे. अध्यक्षपदाचा निर्णय ज्येष्ठ नेते एकत्रित बसून ठरवतील. मात्र मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. बँकेचा कारभार करताना सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
डॉ. सुजय विखे पाटील प्रदेश उपाध्यक्ष, भाजप