

नगर: सहकाराच्या राजकारणाची नस असलेल्या जिल्हा बँकेवर वर्चस्वासाठी दिग्गजांनी एकत्र येत बिनविरोधाच्या दिशेने पाऊल टाकले, पण विस्थापितांचे समाधान करण्यात अपयशी ठरले. परिणामी प्रस्थापितांचे मनसुबे उधळून लावत विस्थापितांनी निवडणूक लादली. मुरब्बी सहकारातील प्रस्थापितांच्या ‘सहकार निती’ समोर विस्थापित उघडे पडून तोंडघशी पडल्याचे निकालातून समोर आले.
सहकारातील बारकावे अन् नेटवर्कमुळं प्रस्थापित मतदारांपर्यंत सहजरित्या पोहचले. विस्थापितांचे नेतृत्व नेटवर्क अभावी चाचपडताना दिसले. विस्थापितांचे नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात होते ते खा.नीलेश लंके पारनेरातच अडकून पडले. किंबहुना त्यांना पारनेरमध्येच अडकून ठेवण्याच्या विस्थापितांच्या डावात लंकेही अलगद अडकले. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचाही विस्थापितांसमोर निभाव लागला नाही.
आ. लहामटेंचा पराभव
अकोले सोसायटीत राष्ट्रवादीचे नेते सीताराम गायकर यांनी मुलगी संजीवनी शिंदे यांनी अपक्ष लढत राष्ट्रवादीचेच आमदार किरण लहामटे यांच्यासमोर आव्हान उभे केले. यात मतदारांना सहलीसह लक्ष्मीदर्शन घडविल्याची चर्चा झाली. संजीवनी शिंदे यांनी ४९ मते मिळवत गुलाल उधळला. आमदार किरण लहामटे यांना ३६ मते मिळाली. पराभवाची चाहुल लागताच आ. लहामटे यांनी मतमोजणी कक्षातून काढता पाय घेतला.
कदम पडले; पण लढले!
राहुरी सोसायटी मतदारसंघात भाजपचेच आ. प्राजक्त तनपुरे व देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यात लढत झाली. आ. तनपुरेंचा सहकारावर मोठा प्रभाव असला तरी अपक्ष कदम यांनी विजयासाठी धडपड केली. कदम यांच्या अपक्ष उमेदवारीने आ. तनपुरेंना मतदारांपर्यंत जाण्यास भाग पडले. १०७ पैंकी तनपुरेंना ८९, तर कदम यांना १८ मते मिळाली. दुष्काळी परिस्थिती पाहता आ. तनपुरे यांनी जल्लोष टाळत शेतकऱ्यांच्या मदतीला धावण्याचा निर्णय घेतला. सत्यजित कदम यांच्यासाठी ही निवडणूक तितकी सोपी नव्हती. मात्र तरीही ते जिद्दीने लढले.
कर्जत-जामखेडवर शिंदेंचे वर्चस्व
कर्जत आणि जामखेड सोसायटी मतदारसंघाच्या दोन्ही जागांवर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी वर्चस्व सिद्ध केले. गतवेळी शेवटच्या मिनिटांत कर्जतची निवडणूक फिरवत अंबादास पिसाळ विजयी झाले होते. यंदा त्यांचे चिरंजीव तुषार यांनी निवडणूक लढवली; पण शिंदे यांच्या परफेक्ट नियोजनासमोर पिसाळ तग धरू शकले नाहीत. शिंदे समर्थक ज्योती शिंदे यांनी ४६ मते मिळवत विजयाचा गुलाल उधळला. तुषार पिसाळ यांना २० मते पडली. जामखेडचे सचिन घुमरे पूर्वीच बिनविरोध झाले. घुमरे व शिंदे यांच्या रूपाने प्रा. शिंदे यांचे कर्जत-जामखेडवरील वर्चस्व अबाधित राहिले.
शेतीपूरकमध्ये आ. काळेच दादा!
गेल्या निवडणुकीत आ. आशुतोष काळे शेतीपूरक मतदारसंघातून बिनविरोध संचालक झाले होते. या वेळी मात्र त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. ८८४ मतदार असलेल्या मतदारसंघात ८८२ मतदान झाले. परिवर्तन मंडळाचे सुधीर रावसाहेब म्हस्के यांनी आ. काळेंसमोर आव्हान उभे केल्याचे चित्र रंगवले गेले; मात्र मतमोजणीत निवडणूक एकतर्फी झाल्याचे दिसले. आ. काळे यांना ७५० मते मिळाली, तर म्हस्के यांना केवळ १२४ मतांवर समाधान मानावे लागले. आ. काळे यांना कोपरगावात १७६ पैंकी १६५ मते मिळाली. राजकीय विरोधक असले तरी सहकारातील निवडणुकीत आ. विवेक कोल्हे, बिपीन कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आ. काळे यांच्यामागे पाठबळ उभे केल्याचे दिसून आले.
नेवाशाला डबल बेनिफिट
ओबीसी मतदारसंघात सहकार पॅनलकडून माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे निष्ठावंत कार्यकर्ते कारभारी जावळे यांनी उमेदवारी दिली गेली. भाजपाचे जालिंदर वाकचौरे यांनी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली; पण मतदारांनी विखे-थोरात-गडाख यांच्यावर विश्वास दाखवला. त्याची परिणती जावळे यांच्या विजयात झाली. जावळे यांनी २०५२ मते घेत संचालकपदाचा मान पटकावला. नेवाशातून माजी मंत्री शंकरराव गडाख हे अगोदरच बिनविरोध झाले. आता जावळे यांच्या रूपाने नेवाशाला आणखी एक संचालक मिळाला.
अखेर पिचडांचे ‘वैभव’ बँकेत!
बँकेच्या गतवेळच्या निवडणुकीत अमित भांगरे यांना पुढे करत वैभव पिचड यांचा जिल्हा बँकेतील प्रवेश सोयीस्कररित्या टाळला. यंदा मात्र पिचड यांनी अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून निवडणूक लढवली अन् विजयही मिळवला. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे सुपुत्र प्रशांत यांचा १६०० मतांनी पराभव झाला.
सांगळे जिंकले; ढाकणेंनीही खिंड लढवली
विमुक्त जाती व भटक्या जमाती मतदारसंघातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात समर्थक गणपत सांगळे पुन्हा मैदानात होते. प्रताप ढाकणेे यांनी ऋषिकेश ढाकणे यांना मैदानात उतरवले. सांगळे प्रस्थापितांचे उमेदवार असले तरी विस्थापित ढाकणे यांनी खिंड जोरकसपणे लढवली. सांगळे यांना २६८७ मते मिळाली तर ढाकणे यांना १२९० मतांवर समाधान मानावे लागले. बिगरशेतीतील मतदारांनी ढाकणेंना बऱ्यापैकी साथ दिल्याचे समोर आले. जामखेड, नगर, पारनेर, श्रीगोंदा मतदारसंघात ढाकणेंना मतदारांनी चाल दिली. पण कोपरगाव आणि संगमनेरच्या मताधिक्यावर सांगळेंचा विजय सुकर झाला.
महिलांमध्ये क्रॉस व्होटिंग अन् सिंगल फुल्याही!
महिला राखीवच्या दोन जागांसाठी नगर तालुक्यातील क्रॉस व्होटिंगमध्ये हर्षदा काकडे यांना चांगली मते मिळाली. पारनेर, श्रीगोंदा व अन्य ठिकाणीही काकडे समाधानकारक मते घेत होत्या. त्याच वेळी अनुराधा नागवडे मात्र आघाडीवर जात होत्या. विखे-थोरातांच्या उमेदवार संगीता वाघ काहीशा मागे असतानाच संगमनेर, कोपरगावसह अन्य तालुक्यात पॅनल टू पॅनल मतांच्या आधारे वाघ यांची पिछाडी भरून निघाली. नागवडेंना सर्वाधिक २६२५, तर वाघ यांना २२८३ मते मिळाली. दोघीही विजयी झाल्या. हर्षदा काकडे यांना १४६८ मते मिळाली. जामखेड, कर्जतने काकडे आणि नागवडेंना कौल दिला. नगरमध्ये काकडे आणि वाघ क्रॉस व्होटिंग झाले. पारनेरमध्ये काकडेंना अल्प मताधिक्य दिसले. शेवगाव-पाथर्डीतही काकडे अपेक्षित मते मिळवू शकल्या नाहीत. नागवडेंना श्रीगोंद्यात २४३ मते, तर वाघ आणि काकडे यांना सुमारे १३२-१४० मते मिळाली.
मतपेटीतील चिठ्ठीत सीताराम तुकाराम!
मतपेटीत मोजणीदरम्यान दोन चिठ्ठ्या आढळल्या. पहिल्या चिठ्ठीत ‘संगमनेर तालुक्यात सीताराम तुकाराम आज पण चालू आहे. यात आमची अडचण होत आहे. तरीही तुम्हाला प्रामाणिकपणे मतदान करत आहे,’ असे लिहिले होते. विजयी गणपत सांगळे यांनी ही चिठ्ठी वाचली आणि निश्चितच ‘बोध घेऊ’ असे मिश्किलपणे सांगितले. कर्जदार कारखानदारांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल धन्यवाद.. अशा स्वच्छ व सुंदर हस्ताक्षरातील एक चिठ्ठी श्रीगोंदा तालुक्यातील मतपेटीत आली. ही चिठ्ठी वाचून अनेकांनी ‘खरं आहे बरं का! अशी दादही दिली.
प्रस्थापितांविरुद्ध निवडणूक अवघड असते. तरीही आम्ही लढलो. ठरावीक लोकांना विरोध करायचा, ही स्वच्छ व स्पष्ट भावना होती. आम्ही लढलो हाच विजय मानतो. चेअरमन कोणीही व्हा, पण बँक सांभाळा.
प्रताप ढाकणे, नेते, परिवर्तन मंडळ
समोरच्या उमेदवाराला माघारीची इच्छा होती, पण त्यांना माघार घेण्यात अडचण आली. मतदारांनी मोठा विश्वास दाखवला. शेतकरी हिताचेच निर्णय घेतले जातील.
आ. आशुतोष काळे
बँकेची थकबाकी असणाऱ्या बड्या बड्यांकडून वसूल करण्यास प्राधान्य दिले जाईल. शेतकरी हिताचे निर्णय घेण्याला प्राधान्य असेल. माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे काल, आज आणि उद्याही माझे नेतेच असतील.
नीलेश लंके, खासदार