

घारगाव: संगमनेर तालुक्यातील पठार भागात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यावर घारगाव पोलिसांनी नुकतीच कारवाई करत ट्रॅक्टर, ट्रॉली व वाळूसह जप्त करत एका वाळू तस्करावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (दि.18) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास येठेवाडी येथील कोंडारमळा शिवारात, मुळा नदी पात्रालगतच्या रस्त्याच्या कडेला ही कारवाई करण्यात आली. विना नंबरच्या लाल रंगाच्या आयशर कंपनीच्या ट्रॅक्टरला लाल रंगाची ट्रॉली जोडून त्यामध्ये वाळूची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचे पोलिसांना आढळून आले.
या कारवाईत पोलिसांनी अर्धा ब्रास वाळू, विना नंबरचा आयशर कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर, लाल रंगाची विना नंबरची ट्रॉली, असा एकूण २ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवनाथ वसंत रोडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास घारगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कोरडे करत आहेत. अवैध वाळू तस्करीचे रॅकेटवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा. त्यांच्या लोकांवर कार्यवाही करून अधिकाऱ्यांची बदली करा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे.
वाळू तस्कर माझ्या शेतजमिनी मधून वाहतूक करतात. माझ्या शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वाहतूक बंद करण्याबाबत सूचना केली असता, त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अद्याप पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नसून महसूलने देखील कानाडोळा केला आहे.
बाळासाहेब फापाळे, शेतकरी, अकलापूर