

नगर : नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने अहिल्यानगरची रणभूमी पेटली आहे. यातून नगरचे राजकारण आता अक्षरशः राजकीय कुरक्षेत्र बनले आहे. महाभारतातील युद्धाप्रमाणे महायुतीचे तीनही घटक पक्ष पांडव-कौरवांप्रमाणेच सत्तासंघर्षासाठी एकमेकांसमोर उभे आहेत. 12 पैकी 10 पालिकांमध्ये महायुतीतील भावंडेच एकमेकांसमोर राजकीय शस्त्र घेऊन उभे आहेत. हे युद्ध जिंकण्यापेक्षा मित्रांना हरवून आपली ताकद दाखवून देण्यावरच लक्ष केंद्रित झाल्याचे दिसते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री नगरमध्ये येऊन एकमेकांच्या विरोधात मैदान गाजविणार आहेत.
महाभारताप्रमाणेच नगरच्या कुरूक्षेत्रावर सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. एकीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीचे पायात पाय घुटमळत असताना, दुसरीकडे महायुतीत महत्त्वाकांक्षा वाढत आहेत. यातून, भाजपाने 12 पैकी 10 जागांवर महायुतीला तिलांजली देऊन स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. शिंदे शिवसेनेनेही स्वतःचे अस्तित्व वाढविण्यापेक्षा भाजपाला ताकद दाखवून देण्यासाठी 9 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यातील सात उमेदवार भाजपाविरोधात, तर दोन महायुतीविरोधात उभे केले आहेत. अजित पवार गटानेही सहा जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यांनीही भाजप, शिवसेनेला शह दिला आहे.
नेवाशात शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी महायुती अभेद्य ठेवत आपल्या पक्षाचे डॉ. करणसिंह घुले उमेदवार दिले आहेत. संगमनेरात आमदार अमोल खताळ यांनी पक्षाकडून सुवर्णा खताळ यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपाने युतीधर्म पाळत उमेदवार दिला नाही. तर कोपरगावात शिंदे सेनेने भाजपाचा उमेदवार असतानाही राजेंद्र झावरे यांना रिंगणात आणले आहे. श्रीरामपुरात भाजपाचे श्रीनिवास बिहाणी हे उमेदवार असतानाही, शिंदे शिवसेनेने भाजपाच्या चित्तेंना फोडून त्यांच्याच हातात ‘धनुष्यबाण’ दिले आहे. देवळाली प्रवरात भाजपाचे सत्यजित कदम यांना अधिकृत उमेदवारी असताना, शिंदे शिवसेनेने बाबासाहेब मुसमाडे यांना पुढे करत भाजपसमोर थेट आव्हान उभे केले आहे. राहुरीतही विखे-कर्डिले यांनी भाजपाकडून सुनील पवार यांना अधिकृत उमेदवारी दिली असताना, शिंदेंच्या शिवसेनेने आपल्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतरही, अपक्ष गुलाब बर्डे यांना पुरस्कृत करून भाजपाला जणू चॅलेंज केले आहे. शेवगावात भाजपाचे अरुण मुंंडे यांना पक्षातून फोडून त्यांच्या घरातच शिंदे शिवसेनेचे माया मुंडे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन भाजपाला मोठी चपराक दिल्याचे बोलले जाते. श्रीगोंद्यातही शुभांगी पोटे यांना उमेदवारी देऊन त्या ठिकाणी भाजपाला शह दिल्याचे लपून राहिलेले नाही. प्रा. राम शिंदे यांच्या जामखेडमध्येही शिवसेनेने पायल बाफना यांना उमेदवारी देऊन राजकीय संघर्षाची तयारी ठेवली आहे.
एकूणच एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेकडून 12 पैकी 9 नगरपालिकांच्या नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. दुसरीकडे, नेवाशात अजित पवारांनी सचिन कडू यांना शिंदे गटाच्या विरोधात उभे केले आहे. शेवगावमध्ये भाजपाच्या उमेदवाराविरोधात विद्या लांडे यांना उमेदवारी दिली आहे. कोपरगावात आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून काका कोयटे यांना भाजपाच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. श्रीगोंद्यात भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून ज्योती खेडकर यांना उभे करून स्थानिक संघर्ष तीव्र केला आहे. जामखेडमध्ये सुवर्णा निमोणकर उमेदवार आहेत. अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या 12 जागांपैकी सहा जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. राहुरीत भाजपाचा उमेदवार असताना त्या ठिकाणी महायुतीत थांबण्यापेक्षा त्यांनी स्थानिक पातळीवर शरद पवारांसोबत जाणे पसंद केेले आहे. या ठिकाणी अरुण तनपुरे हे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत आहेत. संगमनेरमध्येही अजित पवारांची राष्ट्रवादी 8 जागांवर ‘स्वबळ’ आजमावत आहे.
जिल्ह्यात भाजप हा सर्वांत मोठा पक्ष समजला जातो. श्रीरामपुरात शिंदे गटाविरोधात श्रीनिवास बिहाणींना अधिकृत उमेदवारी आहे. राहात्यात डॉ. स्वाधीन गाडेकर उभे आहेत. शिर्डीतून जयश्री थोरात यांना उमेदवारी दिली आहे. कोपरगावात पराग संधान उमेदवार आहेत. राहुरीतून सुनील पवार हे उमेदवारी करत आहेत. श्रीगोंद्यात सुनीता खेतमाळीस, शेवगावमध्ये रत्नमाला फलके, जामखेडमध्ये प्रांजल चिंतामणी, देवळाली प्रवरात सत्यजित कदम, पाथर्डीतून अभय आव्हाड उमेदवार आहेत. भाजपा 12 पैकी 10 जागांवर स्वतंत्र लढत आहे.
एकूणच, जिल्ह्यात विरोधकांची ‘शांतीत क्रांती’ सुरू असताना दुसरीकडे महायुतीतील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. यातून एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. प्रत्येक तालुक्यातून ‘संजय’ आपल्या मुंबईत बसलेल्या द्रोणाचार्यांना पक्षातील राजकीय घडामोडी, अंतर्गत कलह याची खडान्खडा माहिती देत आहे. हेच द्रोणाचार्य स्थानिक पातळीवरील अर्जुनाला ताकद देताना दिसत आहेत.