

राहुरी : देवळाली प्रवरा नगरपरिषदेची निवडणूक स्थानिक पातळीवर नेत्यांच्या दाव्या प्रतिदाव्याने चर्चेचा विषय बनली आहे. मागील सत्ताधारी भाजपा पूर्णपणे अतिआत्मविश्वास आहेत. तर अंतर्गत कुरघोड्यांमुळे काँग्रेसही घायाळ आहे. तिकडे शिवसेनेतही नाराजीनाट्य सुरू आहे. अशी वस्तूस्थिती असताना, तीनही पक्षांना नगराध्यक्ष आपलाच, असे स्वप्न पडू लागले आहे. मात्र, देवळालीकरांच्या मनात सत्ताधाऱ्यांविरोधात त्सुनामी असून, ती ऐनवेळी कोणाच्या पारड्यात पडणार, यावरच निकालाचे गणित अवलंबून असणार आहे.
सत्ताधारी गटातून भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना ही निवडणूक अवघड आहे. त्यांचे एकेकाळचे खंदे समर्थक प्रशांत मुसमाडे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘जय महाराष्ट्र’ करत धनुष्यबाण हाती घेतला. भाजपाचेही दोन शकले झाली आहेत. आदिवासी समाजाचे नेते शिवाजीराव ढवळे आणि आरपीआयचे नेते सुरेंद्र थोरात यांनीही जातीयवादी घटनांमुळे कदमांची साथ केव्हाच सोडली आहे. मुस्लिम समाजालाही त्यांचे अति उत्साही व आक्रमक ‘हिंदूत्व’ फारसे पचनी पडलेले नाही. त्यामुळे गेल्यावेळी त्यांच्यासोबत असलेली व्होट बँक सरळ सरळ रिकामी झाल्याचे चित्र आहे. याशिवाय सत्ताधाऱ्यांवर नाराज असलेली पाच टक्के नैसर्गिक विरोधी मते आणि जवळच्या लोकांनाच उमदेवारीची केलेली खैरात, ही देखील अंतर्गत नाराजी वाढविणारी ठरणार आहे. यासह त्यांचा स्वभाव, पालिकेतील एकाधिकारशाही, जातीपातीचे वाढलेले राजकारण या कमकुवत बाबींवर विरोधक प्रचारात धार आणताना दिसत आहे.
याशिवाय देवळालीच्या राजकीय इतिहासात एकदा नगराध्यक्ष झालेल्या व्यक्तीला पुन्हा दुसऱ्यांना नगराध्यक्ष होता आलेले नाही, ही अलिखीत परंपरा देखील मतदारांच्या मनात रुजविताना दिसत आहे. यातून विरोधक सायकलॉजीकल वॉर करत आहेत. त्यामुळे कदम यांचा नगरपालिकेच्या दिशेने पडणारा प्रत्येक ‘कदम’ हा खडतर असणार असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, काँग्रेसला संधी आहे. मात्र, त्यांच्या गटात कार्यकर्त्यांपेक्षा नेतेच अधिक आहेत. कोणाचाही कोणाला ताळमेळ नाही. जो तो उमेदवार आपल्या पक्षाच्या नगराध्यक्षांपेक्षा आपलाच विजय कसा होईल, यासाठी प्रभागात तळ ठोकून आहे. काही उमेदवार ‘वरच्या फुली’साठी वेगळी तडजोड करत असल्याचेही विरोधक खासगीत सांगू लागले आहेत. विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना याबाबत काहीही माहिती नसल्याचेही विरोधक खासगीत सांगत आहेत. प्रचारात काँग़्रेस पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे.
शिंदे शिवसेनेलाही काँग्रेस इतकीच संधी आहे. मात्र, अजुनही त्यांच्या प्रचाराला गती आलेली नाही. त्यांचाही लंगडा पॅनल झाला आहे. अनेक उमेदवारांना प्रभागही माहिती नाहीत, असे विरोधक आरोप करत आहेत. तर आपला महाविकास आघाडी तुल्यबळ विरोधक ठरू शकतो, शिंदे सेनेशी सामनाच नाही, असे सांगून भाजपचे काही लोकं त्यांना निवडणुकीतून बेदखल करताना दिसत आहेत.
एकूणच, नगराध्यक्ष पदाच्या निवडीत तीनही पक्षांना संधी आहे. मात्र, तितकीच ग्राऊंड पातळीवरील परिस्थिती देखील विरोधभास निर्माण करणारी आहे. त्यामुळे वरवर सर्वांना सोपी वाटणारी ही निवडणूक प्रत्यक्षात किती अवघड आहे, हे निकालानंतरच अनेक मातब्बरांना समजणार आहे. सध्यातरी देवळालीकर धक्कादायक निकाल लावण्याच्या मानसिकतेत असल्याचेही कारखाना परिसरातून पहायला मिळत आहे.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेमध्ये उमेदवार म्हणून उभे असलेले प्रकाश संसारे, अमोल कदम, विकी पंडित, प्रतिक फुलपगार यांसह काही उमेदवारांबाबत अर्जातील त्रुट्या दाखवून आक्षेप नोंदविले आहे. याबाबत दाद मागण्यात आली आहे. निवडणूक आयोगासह न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.