

कोपरगाव : सतत वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या कोपरगाव- येवला महामार्गावर भर दिवसा बिबट्याने रुबाबात एन्ट्री केल्यामुळे येथील दहशत कायम आहे. सायंकाळी 5.30 वाजता येवल्याकडून कोपरगावकडे येताना हॉटेल पाम पॅराडाईजसमोरून नरोडे वस्तीच्या दिशेने रुबाबात रस्ता क्रॉस करणारा बिबट्या डॉ. राजेंद्र श्रीमाळी यांच्या नजरेस पडला. महामार्ग ओलांडून ऐटीत चालणारा बिबट्या त्यांनी प्रत्यक्ष पाहिला.
या घटनेची माहिती त्यांनी तत्काळ आजुबाजूच्या नागरिकांसह मोबाईल कॉलद्वारे परिचितांना दिली. यावेळी नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असुनही वनविभागाकडून कोणत्याच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. यामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. वनविभाग झोपेत आहे का.
आणखी नरबळी गेल्या नंतरचं हालचाल करणार का, असा टोकाचा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या भागात तातडीने पिंजरे लावून, बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
कोपरगाव- येवला महामार्गालगत गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा मुक्त संचार सुरूच आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात आत्तापर्यंत दोघांचे बळी गेले आहेत. एका बिबट्याचा खात्मा करण्यात आला, मात्र रविवारी पुन्हा बिबट्याने दर्शन दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. नागरिक, शेतकरी व महिला संध्याकाळी घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. थंडीचे दिवस असल्यामुळे संध्याकाळनंतर या परिसरात अक्षरशः सन्नाटा पसरतो.