

शिरसगावः अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध व्हॉटस् ऍप ग्रुपमध्ये निनावी मेसेज व्हायरल करण्यात येत आहे की, ‘नाशिक जिल्ह्यात लाल कांदाची प्रचंड प्रमाणात आवक वाढल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील गावरान कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात पडत आहेत,’ असा निनावी मेसेज व्हायरल करून, जिल्ह्यातील गावरान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भिती दाखविण्यात येत आहे. नाशिक लाल कांदा आवकेची भिती घालून अहिल्यानगर जिल्ह्यातील गावरान कांदा भाव पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
वस्तुतः नाशिक जिल्ह्यात लाल कांदा पिकाचे अतिवृष्टीमुळे तब्बल 70- 80 टक्के नुकसान झाले आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांदा आवक दररोज फक्त 30- 35 टन होत आहे. ही आवक अत्यंत नगण्य आहे. यामुळे गावरान कांदा भावावर काहीही परिणाम होऊ शकत नाही, परंतू काही शेतकरी विघातक घटक निनावी मेसेज व्हायरल करून, कांद्याचे भाव पाडण्याचे षडयंत्र रचत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवून कांद्याचे भाव पाडण्याचे षडयंत्र करणाऱ्यांविरुद्ध सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल करावी.
नाशिक लाल कांदा आवकेचे कारण सांगून, अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यापारी गावरान कांदा कमी भावात खरेदी करीत असल्यास, रीतसर तक्रार बाजार समितीचे सभापती, संचालक व सचिवांचे कडे करावी. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करावी, असे आवाहन निलेश शेडगे यांनी केले आहे