

आश्वी: संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द (हरणदरा) परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बिबट्याच्या दहशतीला अखेर काही प्रमाणात लगाम लावण्यात आला आहे. सर्जेराव तुकाराम जोशी यांच्या वस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. हे वृत्त समजताच येथील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
दाढ खुर्द शिवारातील जोशी यांची वस्ती आहे. या परिसरात बिबट्याचा संचार मोठ्या प्रमाणात वाढला होता. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वन कर्मचाऱ्यांनी येथे पिंजरा लावला होता. मध्यरात्री भक्ष्याच्या शोधात भटकत आलेला बिबट्या या पिंजऱ्यात जेरबंद झाला. सकाळी ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी दाटली होती.
सरपंच सतीश जोशी, बी. टी. जोशी, सर्जेराव जोशी, ज्ञानेश्वर जोशी, नवनाथ जोशी, ईश्वर जोशी, राहुल जोशी, मनोहर जोशी, निलेश जोशी, सूर्यभान जोशी, संजय भांड, राजू पर्वत, गोवर्धन जोशी, संदीप जोरी, ज्ञानेश्वर वाडगे, विकास जोशी, अविनाश जोशी, गोरख भांड, नारायण काहार, संजय जोशी, अशोक जोशी, शांताराम महाराज जोरी यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.
एक बिबट्या जेरबंद झाला असला तरी, ग्रामस्थांमधील भिती अद्याप पूर्णतः संपली नाही. या परिसरात बिबट्यांची संख्या जास्त आहे.
पाळीव प्राण्यांसह अगदी मानवावर हल्ला होण्याचे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने या भागात पिंजरे लावून इतर बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांकडे केली आहे.