

कोळपेवाडी : आ. आशुतोष काळे हे खूप हट्टी आहे. कोपरगावच्या विकासाची काळजी घेणारे नेतृत्व आहे. मी कधी कोणाचे ऐकत नाही, पण आशुतोष हा लाडाचा असल्याने त्यांची दादागिरी मलाही सहन करावी लागते. कोपरगावच्या विकासासाठी निधीची कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देतानाच आ. काळे यांना कोपरगावाकरांनी साथ द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या प्रचारार्थ कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानातील आयोजित सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे, जिल्हा सहकारी बँकेच्या मा. संचालिका चैताली काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, कोपरगाव एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, महानंदाचे माजी चेअरमन राजेंद्र जाधव, कारभारी आगवन, नारायणराव मांजरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाण्याचे व्हा.चेअरमन प्रविण शिंदे, काकासाहेब जावळे, संभाजीराव काळे, बाबासाहेब कोते, धरमचंद बागरेचा, बाळासाहेब आढाव, डॉ.अजय गर्जे, सतीश कृष्णानी, सुहासिनी कोयटे, तालुकाध्यक्ष चारूदत सिनगर, शहराध्यक्ष सुनिल गंगुले, युवक अध्यक्ष कृष्णा आढाव, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, वीरेन बोरावके, दिनार कुदळे, फकीर कुरेशी, संदीप कोयटे, स्वाती कोयटे, प्रकाश दुशिंग, शिवाजीराव ठाकरे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, गत महिन्यात कोपरगावात बिबट्या हल्ल्याची घटना घडली. त्यावेळी आ. काळे यांनी फोन केला, पण बैठकीत व्यस्त असल्याने बोलणे शक्य नव्हते. तसा निरोप दिला, पण आशुतोषने आताच दादांशी बोलायचे असा हट्ट केला, पीएने तसा निरोप दिला. बैठकीतूनच आशुतोषसोबत बोललो. त्यावेळी त्यांनी बिबट्याचा हल्ला कथन करत कायदा व सुव्यवस्थेचा माहिती दिली. मी कोपरगावच्या नागरिकांशी संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने फोन करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. आमदार आशुतोष हे लाडाची दादागिरी माझ्यावर चालवतो, हे राज्यालाही माहिती आहे. लाडाचा असल्याने मीही ती लाडकी दादागिरी सहन करतो.
मात्र त्या दादागिरीमागे कोपरगावची काळजी असते, त्यामुळेच मी ती सहन करतो. आ. काळे यांच्या विकासाच्या संकल्पनांना निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. राष्ट्रवादीने सक्षम आणि विकासाची दृष्ठी असलेले उमेदवार दिलेले आहेत. विकासाचे व्हिजन पूर्णत्वासाठी आ. काळे यांनी सामाजिक कार्यात पुढे असणारे काका कोयटे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. हक्काने समस्या मांडणार व त्याची सोडवणूक करणाऱ्या आ. काळे यांच्या पाठिशी माझे भक्कम पाठबळ आहे. तरुण आणि विकासाचे व्हिजन घेवून चालणारे आ. काळे यांना काका कोयटे यांची साथ आणि माजी आ. अशोक काळे यांचे मार्गदर्शन असल्याने कोपरगावचा विकास वेगाने होईल, असा विश्वास मंत्री पवार यांनी व्यक्त केला.
आ.आशुतोष काळे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून पाणी पुरवठा योजना मंजूर होवून पाच नंबर साठवण तलाव पूर्ण झाला. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागल्याने 23 दिवसांनी मिळणारे पाणी आता तीन दिवसाआड मिळत आहे. दररोज पाणी द्यायचे नियोजन असून त्यासाठी 3 आणि 4 नंबरचा तलाव सिमेंट कॉक्रीटचा करायचा असून 2 आणि 3 साठवण तलावाच्या जागेवर सोलर पॉवर प्लांट उभारायचा आहे. शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा संपवण्यासाठी गरज पडल्यास 6 नंबर तलावाला जमीन घेण्यासाठी निधीच गरज भासणार आहे. 280 कोटी निधीतून भूमिगत गटारीचे काम लवकरच सुरु होणार आहे.
शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच शहरामध्ये पंचायत समिती क्वार्टर्स व पशु संवर्धनच्या या दोन ठिकाणी शासनाच्या जागा असून त्या जागेवर बीओटी तत्वावर व्यापारी संकुल उभारणीची परवानगी द्यावी. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीकाठ सुशोभिकरण करायचे आहे. एचएएम (क-चच्या) योजनेतून 60 किलोमीटरच्या रस्त्याची मागणी आ. काळे यांनी केली. त्या पूर्ण करण्याचा आग्रह आ. काळे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केला.