Ahilyanagar Municipal Politics: महापालिकेतील सत्ताकारणात धक्का-तंत्र; राष्ट्रवादी-भाजपचे गटनेते अचानक जाहीर
नगर : महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची आणि भाजपच्या गटनेतेपदी शारदा ढवण यांची निवड बुधवारी करण्यात आली. युतीतील घटक असलेल्या या दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी नाशिक येथील विभागीय आयुक्तालयात पक्षनिहाय गटनोंदणी केली. दरम्यान, गुरुवारी महापौरपदाची आरक्षण सोडत होत असल्याने महापौर निवडीच्या प्रक्रियेला गती येणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीनंतर मंगळवारी विजयी उमेदवारांचे राजपत्र प्रसिद्ध झाले. त्यानंतर लगेच गटनेते निवडीच्या हालचाली सुरू झाल्या. राष्ट्रवादी भाजपचे नगरसेवक एकत्रित गट नोंदणीसाठी बुधवारी नाशिककडे रवाना झाले. नगरसेवक नाशिककडे रवाना होईपर्यंत गटनेता कोण, हे कोणालाही माहीत नव्हते. नाशिक येथे विभागीय आयुक्तांसमोर भाजपने स्वतंत्रपणे गटनोंदणी करत गटनेतेपदी शारदा ढवण यांची निवड केली. गटनेते पदासाठी शारदा ढवण यांचे नाव अचानक पुढे आले. ढवण यांच्या निवडीने भाजपने सर्वांनाच धक्का दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही तोच कित्ता गिरवला. पक्षाची 27 नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी करण्यात येऊन गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची निवड करण्यात आली. महापौर पदाचे आरक्षण निश्चित नाही. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा केला जाईल.
दरम्यान, उद्या महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत होणार आहे. त्यात अहिल्यानगर महापालिकेचा समावेश आहे. आरक्षण सोडतीनंतर महापौर पदाचे उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे.
डॉ. सुजय विखे यांची हजेरी
भारतीय जनता पक्षाचे सर्वच नगरसेवक आज नाशिक येथे विभागीय कार्यालयात गट नोंदणीसाठी गेले होते. यावेळी नगरसेवकांबरोबर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित होते. त्यामुळे डॉ. पाटील यांनी महापालिकेच्या निवडणुकीवर बारकाईने लक्ष दिल्याचे अधोरेखित होत आहे.
महापालिकेत सोशल इंजिनिअरिंगचे पर्व
अहिल्यानगर महापालिकेच्या सत्ताकारणात शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप व भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग सुरू केला आहे. त्याची चुणूक आज झालेल्या गटनोंदणीत दिसून आली. अहिल्यानगर जिल्ह्याचे नामांतर झाल्यानंतर पहिल्यांदा महापालिकेच्या गट नेतेपदी धनगर समाजाच्या शारदा ढवण यांना विराजमान केले आहेे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही गवळी समाजातील नामवंत व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्या गळ्यात गटनेते पदाची माळ घातली.
अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युती करीत सामोरे गेले. जागावाटपाच्या तिढ्यात शिवसेना स्वतंत्र झाली. शिवसेना युतीतून बाहेर पडल्यानंतरही राष्ट्रवादी-भाजपने युती करीत निवडणूक लढविली. नगरसेवक उमेदवारी वाटपातही भाजप राष्ट्रवादी काँग्रेस सोशल इंजिनिअरिंग साधली. सर्वच समाज घटकांतील पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्यात यशस्वी सुवर्णमध्य साधला. मराठा, जैन, माळी, ब्राह्मण, पद्मशाली, गवळी, मागसवर्गीय अशा विविध समाजातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यामुळे राष्ट्रवादी व भाजपला मतदारांनी भरघोस मते दिली, असे म्हणता येईल.
राष्ट्रवादी काँग्रेसला 32 पैकी 27 तर, भाजपला 32 पैकी 25 जागांवर विजय मिळाला. त्याच सोशल इंजिनिअरिंगचा कित्ता आता गट नोंदणीतही गिरवल्याचे दिसते. आमदार संग्राम जगताप व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शेवटपर्यंत गटनेत्यांच्या नावाबाबत सस्पेन्स ठेेवला होता. नगरसेवकांचा जथ्था थेट नाशिक येथील विभागीय कार्यालयात गेल्यानंतर गटनेत्यांचा पत्ता ओपन केला.
गटनेता नोंदणीत दोन्ही पक्षांनी धक्काच दिला असे म्हणावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याच पदासाठी प्रकाश भागानगरे यांचे नाव चर्चेत नसतानाही त्यांना गटनेते पदाची लॉटरी लागली. भाजपकडून शारदा ढवण यांची गटनेतेपदी निवड झाली. त्याचे नाव अनेक्षितपणे पुढे आल्याने सर्वांच धक्का बसला.
दरम्यान, हीच सोशल इंजिनिअरिंग महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, महिला व बालकल्याण समितीच्या निवडीतही होणार का, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. या पदांच्या निवडीतही सोशल इंजिनिअरिंग झाले तर, कोणाची कोणत्या पदावर वर्णी लागणार, याची उत्सुकता नगरकरांना लागली आहे.

