

नगर : टीईटी निकालामुळे आणि शासनाने मार्गदर्शन प्राप्त झाल्याने अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिक्षक पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात केंद्र प्रमुख पदाची पदोन्नती केली जाणार असून, त्यानंतर संच मान्यता अंतिम होताच, उपाध्यापक, मुख्याध्यापक पदोन्नतीचाही प्रश्न सुटणार आहे. दरम्यान, शिक्षक संघटनांनी पारदर्शीपणे आणि शासन नियमानुसार कोणावरही अन्याय होणार नाही, या पद्धतीने या पदोन्नत्या कराव्यात, अशी मागणी केली आहे.
‘सुप्रिम’च्या आदेशानुसार गुरुजींना नोकऱ्या टिकवण्यासाठी आणि पदोन्नतीचा लाभ घेण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे पदोन्नती थांबल्या होत्या. शिक्षक संघटनांच्या मागण्यानंतर शासनाकडे मार्गदर्शने मागाविण्यात आले होत. त्यानुसार अटी व शर्थींच्या अधिक राहून पदोन्नतीसाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अंदाजे मुख्याध्यापकाचे 100, विस्तार अधिकारी 50 आणि केंद्र प्रमुखाचे 60 पेक्षा अधिक पदोन्नत्या केल्या जाणार आहेत.
काल अवर सचिव शरद माकणे यांनी एक पत्र काढून, त्याव्दारे न्याय निर्णय पारीत झाल्यापासून दोन वर्षे कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधिन राहून शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी या पदावर तूर्तास पदोन्नती देता येणार नाही. ज्या शिक्षकांनी टीईटी परीक्षा उर्त्त्तीण असेल तसेच आवश्यक अन्य अहर्ता धारण केली असेल केवळ असेच शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र असणार आहेत, असे स्प्ष्ट केले आहे.
अंतिम संच मान्यता झाल्यानंतरच मुख्याध्यापकांची पदोन्नती केल्या जाणार आहेत. मात्र, पटसंख्या कमी झालेली असल्याने जिल्ह्यात साधारणतः 100 पेक्षा कमी पदे रिक्त दिसणार असल्याचेही माहिती प्रशासनाकडून समजली. पदवीधर शिक्षक पदोन्नतीसाठीही संबंधितांचे संचमान्यतेकडे लक्ष आहे.
केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी पदोन्नतीसाठी संच मान्यतेची अडचण नाही. यात केंद्र प्रमुखाची साधारणतः 65 पदे रिक्त आहेत. त्यासाठी पदवीधर शिक्षक म्हणून सहा वर्षे सेवा केलेली असावी, हीच सेवा ज्येष्ठता म्हणून गृहीत धरली जाणार आहे. दरम्यान, पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा दोन्ही उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे की ‘पहिली’ पास असली तरी तो पात्र ठरू शकतो, यावरून मोठा संभ्रम आहे.