Police Drug Scandal Maharashtra: ड्रग्जविरोधी कारवाईत काळा डाग; पोलिस अंमलदारच एमडी ड्रग्ज चोरी-विक्रीत अडकला
पुणे : पोलिसांनी विविध छाप्यांमध्ये जप्त केलेले मेफेड्रोन (एमडी) सारख्या भयानक अंमली पदार्थ (ड्रग्ज) विक्रीच्या संशयावरून पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिस पथकाने शिरूरच्या गॅरेजचालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक किलो ड्रग्ज मिळाले. चौकशीत ड्रग्जचे धागेदोरे अहिल्यानगर एलसीबीपर्यंत येऊन पोचले. एलसीबीत कार्यरत असणाऱ्या पोलिस अंमलदार श्यामसुंदर विश्वनाथ गुजर याला पुणे पोलिसांनी बुधवारी पहाटे बेड्या ठोकल्या. गुजर पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जची चोरी करून वित असल्याचे तपासात पुढे आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पुणे ग्रामीण एलसीबी व शिरूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत शिरूर शहरातील डंबेनाला परिसरातील बाबूरावनगर मोकळ्या मैदानात ड्रग्ज विक्रीसाठी येणाऱ्या गॅरेजचालक शादाब रियाज शेख (वय 41) याला ताब्यात घेतले. ही कारवाई 18 जानेवारी रोजी करण्यात आली. त्याच्याकडून एक किलो 52 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी आरोपी शादाब शेख याचा अहिल्यानगर एलसीबीतील श्यामसुंदर गुजर याच्याशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार बुधवारी पहाटे पुणे एलसीबी व शिरूर पोलिसांनी अहिल्यानगर एलसीबीतील कर्मचारी श्यामसुंदर गुजर याला चौकशीकामी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पोलिसांनी कारवाई करून आणलेले ड्रग्जची विक्री केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली. त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.
चोरले ड्रग्ज आणि ठेवला मैदा?
अहिल्यानगर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर परिसरात छापेमारी करून 25 किलो ड्रग्ज जप्त केले होते. मुद्देमाल कक्षातून दहा किलो ड्रग्ज एलसीबीतील कर्मचारी श्यामसुंदर गुजर याने चोरल्याचा संशय आहे. त्याने ड्रग्ज चोरून त्या ठिकाणी मैद्यासारखा पदार्थ ठेवल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
अन् रॅकेट उघड झाले
पोलिस अंमलदार श्यामसुंदर गुजर याने मुद्देमालातील साडेदहा किलो ड्रग्ज चोरून बाहेर काढले. एक किलो अंमली पदार्थ ऋषिकेश चित्तर याला विक्रीसाठी दिले. त्याने ते माऊली शिंदे याला दिले. माऊली शिंदे याने शादाब शेख याच्याकडे दिले. पुणे पोलिसांनी चित्तर याला पकडल्यानंतर पुढची साखळी जुळत गेली. शेवटी पोलिस अंमलदार श्यामसुंदर गुजर याचे नाव पुढे आले.
पोलिस अंमलदार श्यामसुंदर गुजर 2008 मध्ये पोलिसात भरती झाला. तो सुरुवातीला पारनेर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. तिथेही तो मुद्देमाल कारकून होता. त्यानंतर त्याची तोफखाना पोलिस ठाण्यात बदली झाली. तोफखाना पोलिस ठाण्यातून तत्काळ त्याची एलसीबीमध्ये नियुक्ती करण्यात आली होती.
असा झाला तपास..
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार एलसीबी पोलिसांनी शिरूर परिसरात 18 जानेवारीला छापा टाकून शादाब रियाज शेख (वय 41, गॅरेज चालक) याच्याकडून 1 किलो 52 ग्रॅम एमडी जप्त केले. त्याच्या चौकशीतून पारनेर तालुक्यातील माऊली शिंदे व त्याच्या पंटरची नावे पोलिसांनी समजली. माऊली शिंदेकडून 9 किलो 655 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. चौकशीत शिंदेने हे ड्रग्ज पोलिस कर्मचारी श्यामसुंदर गुजर याच्याकडूनच घेतल्याची कबुली दिली. तांत्रिक तपासातही गुजरचा थेट सहभाग निष्पन्न झाला.

