

जामखेड : जामखेड–नगर रोडवरील नवीन बस स्थानकाजवळ असलेल्या अर्धवट दुभाजकामुळे कार पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक जखमी झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून जखमी चालकास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघातांच्या घटना घडल्या असून, गंभीर अपघात होऊनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दुर्घटना घडल्यानंतर केवळ हळहळ व्यक्त केली जाते; मात्र प्रत्यक्षात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाय होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
नगर रोडवर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. रात्री अंधारामुळे दुभाजक नेमके कुठे सुरू होतात, हे वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. दुभाजकांवर रिफ्लेक्टर, प्रकाश व्यवस्था व सूचना फलक नसल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. प्रशासनाने तातडीने दुभाजकांची दुरुस्ती करावी, पुरेशी प्रकाश व्यवस्था व स्पष्ट सूचना फलक उभारावेत, जेणेकरून भविष्यात निष्पाप नागरिकांचे बळी जाऊ नयेत, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
आणखी किती जणांचे बळी घेणार हा रस्ता?
जामखेड सौताडा या रस्त्यावर अनेक जणांचे बळी गेले आहे. आजुन किती बळी घेणार असा सवाल जामखेड करणी व्यक्त केला आहे. या रस्त्यावर वारंवार अपघात होऊनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नाही. दुभाजक अपूर्ण अवस्थेत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.