

नगर: सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि वाढत्या खंडामुळे भूजलपातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १९४ गावे आणि १ हजार १२६ वाड्यांतील विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे चार लाख जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या जिल्ह्यात २१८ टँकर सुरू आहेत. दिवसेंदिवस पाणीटंचाईच्या झळा तीव्र होणार असून टँकरची संख्याही वाढणार आहे.
उन्हाळ्याबरोबरच ऐन पावसाळ्यातही संगमनेर, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, पारनेर व अहिल्यानगर तालुक्यांत टँकर सुरूच होते. गेल्या वर्षासारखा यंदादेखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, अशी आशा होती. परंतु यंदा ३५ टक्के पावसाची तूट झाली. दमदार पाऊसदेखील चार महिन्यांत झाला नाही. सप्टेंबर महिन्यात २०२ विहिरींची पाणीपातळी तपासली असता जवळपास तीन मीटरने भूजलपातळी खालावली असल्याचे निदर्शनास आले. पुढील पावसाळ्यापर्यंत भूजलपातळी आणखी खालावणार असून, दिवसेंदिवस पाणी अधिकच खोल खोल जाणार आहे.
१८ ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यातील १८३ गावे आणि १ हजार ७७ वाड्यांसाठी १९४६ टँकर सुरू होते. त्यानंतर चार दिवसांत नगर तालुक्यात एक गाव आणि १० वाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे या तालुक्यात नव्याने चार टँकर सुरू झाले. पारनेर तालुक्यात ४ गावे आणि १५ वाड्यांना टंचाई भासली. त्यामुळे या तालुक्यात नव्याने ६ टँकर वाढविण्यात आले. पारनेर शहरात आठ टँकर होते. तेथे ते पुरेसे नसल्याने आणखी नवीन पाच टँकरला मान्यता देण्यात आली.
कर्जत तालुक्यातील २ गावे आणि १० वाड्यांत टंचाई निर्माण झाल्याने नव्याने ३ टँकरला मान्यता देण्यात आली. पाथर्डी तालुक्यात यंदा टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. नव्याने या तालुक्यातील २ गावे आणि १२ वाड्यांना झळा बसल्या आहेत. त्यामुळे येथे नव्याने ३ टँकर मंजूर करण्यात आले. संगमनेर तालुक्यातही पाणीटंचाई वाढू लागली आहे. या तालुक्यात नव्याने १ गाव आणि एका वाडीत पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे या तालुक्यात नव्याने १ टँकर वाढविण्यात आला आहे.
२४ ऑक्टोबरपर्यंत जिल्हाभरातील १९४ गावे आणि १ हजार १२६ वाड्यांतील चार लाख जनतेला २१८ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अहवालात म्हटले आहे.
तालुकानिहाय टँकरसंख्या
पाथर्डी : ८४, कर्जत : ३३, शेवगाव : २३, अहिल्यानगर : २३, जामखेड : १६, संगमनेर : ९, पारनेर: ११, श्रीगोंदा: ४, नेवासा: २, पारनेर शहर: १३.