

नगर: दारणा प्रकल्पावरील गोदावरी कालव्याच्या पाण्याचे रब्बी हंगामासाठी ३० तर उन्हाळी पिकांसाठी ४८ दिवस आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. या दोन्ही आवर्तनासाठी ७.७०८ टीएमसी पाणी वापर असल्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असली, तरी लाभक्षेत्रातील नागरिकांच्या व शेतीच्या गरजा लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचे अत्यंत काटकसरीने व योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. सर्वांनीच पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहनही त्यांनी केले.
दारणा प्रकल्पावरील गोदावरी कालव्याच्या सन २०२६-२७ मधील रब्बी व उन्हाळी हंगामातील पाण्याचा सुयोग्य वापर व संभाव्य आवर्तनाच्या नियोजनासंदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक शनिवारी (दि.२४) राहाता येथे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस आमदार आशुतोष काळे, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी व लाभधारक शेतकरी उपस्थित होते.
प्रारंभी अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने यांनी रब्बी व उन्हाळी आवर्तनाच्या संभाव्य नियोजनाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामाच्या संभाव्य आवर्तनाचे वेळापत्रक सादर केले. यावेळी रब्बी हंगामासाठी २.६२० टीएमसी तर उन्हाळी आवर्तनासाठी ५.१८८ टीएमसी पाणी वाटप नियोजनास कालवा सल्लागार समितीने जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता दिली.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना विविध कामांसाठी शासकीय कार्यालयांत वारंवार चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी जलसंपदा विभागाचे कामकाज जलद गतीने आणि ऑनलाइन करण्यावर भर द्यावा . शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जांची व कामांची माहिती थेट मोबाईलवर उपलब्ध व्हावी आणि विविध डिजिटल सेवा सुलभतेने मिळाव्यात यासाठी प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी उपस्थित शेतकर्यांना सांगितले. यावेळी अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने यांनी रब्बी व उन्हाळी आवर्तनाच्या संभाव्य नियोजनाची सविस्तर माहिती दिली.
रब्बी हंगामासाठी २.६२० टीएमसी
रब्बी हंगाम ३० दिवसांचा असणार आहे. १ डिसेंबर २०२६ ते ३० डिसेंबर २०२६ या कालावधीत २.६२० टीएमसी पाणी वापर होणार आहे. हे आवर्तन सिंचन व बिगर सिंचनासाठी उपलब्ध असणार आहे.
उन्हाळी आवर्तन ५.१८८ टीएमसीचे
उन्हाळी हंगाम ३ टप्प्यांचा असून, तो ४८ दिवसांचा आहे. या हंगामासाठी ५.१८८ टीएमसी पाणी वापराचे नियोजन करण्यात आले आहे. पहिला टप्पा २२ दिवसांचा असून, १ मार्च २०२७ ते २२ मार्च २०२७ पर्यंत मर्यादित सिंचन व बिगर सिंचनासाठी २.४३ टीएमसी पाणी वापर होणार आहे. दुसरा टप्पा १३ दिवसांचा असून, ५ मे ते १७ मे २०२७ पर्यंत बिगर सिंचनासाठी १.४३ टीएमसी पाणी वापर केला जाणार आहे. तिसरा टप्पा हा १३ दिवसांचा असणार असून, १० जुलै ते २२ जुलै २०२७ या कालावधीत १.३२८ टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे.