Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ओबीसी, महिला राखीव जागांवर चुरस

विखे–थोरातांच्या सहकार पॅनलसमोर लंके–लोखंडेंच्या परिवर्तन पॅनलचे आव्हान; छुप्या युत्या आणि क्रॉस व्होटिंगकडे लक्ष
Ahilyanagar District Bank
Ahilyanagar District BankPudhari
Published on: 
Updated on: 

गोरक्ष शेजूळ

नगर: जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत सहकारातील दिग्गज विखे–थोरात प्रस्थापितांच्या सहकार पॅनल विरोधात खासदार नीलेश लंके आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे या विस्थापितांच्या परिवर्तन पॅनलने निवडणुकीत रंग भरण्यास सुरूवात केली आहे. स्थानिक नेत्यांची भूमिका, मतांची विभागणी, संभाव्य छुप्या युत्या आणि क्रॉस व्होटिंग यामुळे ओबीसी अन महिला राखीव मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १४ तालुक्यांत मतदारांच्या संख्येसोबतच तेथील राजकीय परिस्थितीही वेगळी आहे.

Ahilyanagar District Bank
Sugarcane Farmers Protest: गुहा येथे ऊसगाड्या रोखल्या; शेतकरी सेनेचे आंदोलन तात्पुरते स्थगित

सर्वाधिक ७१५ मतदारसंख्या असलेल्या संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचा प्रभाव आहे. रणजित देशमुख बिनविरोध निवडून आले असून, भटक्या विमुक्त मतदार संघातून गणपत सांगळे यांची उमेदवारीही लक्षवेधी ठरत आहे. मात्र थोरात विरोधातील एक गटही येथे आहे, त्यांच्याकडेही ठराव आहेत, हे दुर्लक्षून चालणार नाही. कोपरगाव ५२९ मते आहेत. प्रस्थापितांकडून बिपिन कोल्हे बिनविरोध निवडून आले असून, आशुतोष काळे शेतीपूरक मधून मैदानात आहेत. उर्वरित पाच जागांवर स्थानिक उमेदवार नसल्याने कोल्हे आणि काळे यांच्यातील समन्वय खरोखर पॅनल टू पॅनल दिसणार का? याची उत्सुकता आहे. नगर तालुक्यात ३९१ मते आहेत. आमदार अक्षय कर्डिले बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, तालुक्यातील इतर मतदारसंघांतील मतदानाचा कलही राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचा आहे.

Ahilyanagar District Bank
Darna Project Water Rotation: दारणा प्रकल्पातून रब्बीसाठी ३०, उन्हाळी पिकांसाठी ४८ दिवस पाणी आवर्तन

श्रीगोंदा २९९ मते असून, प्रस्थापितांकडून महिला राखीव प्रवर्गातून अनुराधा नागवडे मैदानात आहेत. सोसायटीच्या जागेतून राहुल जगताप यांना बाहेर काढण्यासाठी प्रस्थापितांनी केलेले प्रयोग त्यांचे समर्थक विसरू शकत नाहीत. त्यामुळेच आमदार विक्रम पाचपुतेंपेक्षा राहुल जगताप यांची भूमिका महत्वाची असणार आहे. दत्ता पानसरे बिनविरोध निवडून आले असले तरी त्यांची राजकीय भूमिका भल्या भल्यांना समजलेली नाही. त्यामुळे श्रीगोंद्यात काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. राहाता तालुक्यात २६३ मते आहेत. बहुतांशी ठराव डॉ. सुजय विखे पाटील यांचे आहेत. मात्र सुधीर मस्के हे शेतीपूरक मधून विस्थापितांचे उमेदवार असल्याने तालुक्याच्या मतदानाकडेही लक्ष असणार आहे.

राहुरी २५८ मते आहेत. आमदार प्राजक्त तनपुरे आणि सत्यजित कदम यांच्यातील लढतीमुळे खालील पाच जागांमध्ये मतविभागणीची शक्यता चर्चेत आहे. संगीता वाघ यांच्यासाठी काही प्रमाणात तालुका अनुकूल असला तरी इतर चार जागांसाठी येथे पडद्यामागे घडामोडी घडण्यास सुरूवात होत असल्याचे चित्र आहे. नेवासा २४६ मते आहेत. माजी मंत्री शंकरराव गडाख हे सहकार पॅनलचे नेते आहेत. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून करभारी जावळे हे त्यांचेच उमेदवार आहेत. त्यांना नेवाशातून फायदा मिळेल मात्र इतर उमेदवारांमधून कोण चालणार, हेही महत्त्वाचे मानले जाते.

Ahilyanagar District Bank
Gold and Silver Price: सोन्याच्या दरात ४ हजार, तर चांदीत १५ हजारांची घसरण

अकोले २३१ मते आहेत. आमदार किरण लहामटे आणि संजीवनी शिंदे यांच्यातील लढतीकडे लक्ष आहे. वैभव पिचड यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकीय समीकरणांची चर्चा सुरू आहे. सोसायटी शिंदे आणि खाली लोखंडे चालू शकतात. तर वरती लहामटे आणि खाली लोखंडे असेही समीकरण रंगू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. एकूणच अकोल्यात जांगडगुत्ता असल्याचे दिसते.

पारनेर २२७ मते आहेत. खासदार नीलेश लंके यांच्या उमेदवारीमुळे पारनेरला विशेष महत्त्व आले आहे. लंके यांच्याकडे बहुतांशी ठराव आहेत. मात्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी लक्ष केंद्रित केल्याने चुरस वाढताना दिसत आहे. आता लंकेंना स्वतःच्या विजयासह पॅनललाही मतदान घडवून आणण्याची जबाबदारी असणार आहे. आमदार काशिनाथ दाते यांना प्रस्थापितांनी मागून देखील एकही जागा दिलेली नाही, त्यामुळे त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात, हेही पहावे लागणार आहे. त्यांच्याकडे ३० पेक्षा जास्त ठराव आहेत.

Ahilyanagar District Bank
Shirdi Sai Baba: शिर्डीत साईभक्ताची अनोखी भेट! २७ लाखांची सोनेरी शिळा साईचरणी अर्पण

कर्जत १६८ मते; जामखेड ११५ मते आहेत. या दोन्ही तालुक्यांत प्रा. राम शिंदे यांचा राजकीय प्रभाव आहे. दोन्ही तालुक्यांतील एकत्रित २८३ मत आहेत. जामखेड मध्ये शिंदे समर्थक सचिन घुमरे बिनविरोध झाले आहेत. कर्जतमध्ये ज्योती शिंदे यांना सभापती शिंदे हे मतदान घडवून आणतीलच. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यातून खाली ओबीसी आदिनाथ हजारे आणि महिला मंजुषा गुंड वगळता अन्य तीन फुल्या विस्थापितांना मिळाल्या तर राजकीय गणित बदलायला वेळ लागणार नाही, अशीही चर्चा रंगली आहे. श्रीरामपूर १४७ मते आहेत. करण ससाणे बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र भानुदास मुरकुटे यांना प्रस्थापितांनी राजकीय कोंडी करून बाजूला ठेवल्याचे शल्य त्यांच्या समर्थकांना आहे. त्यांचेही ठराव आहेतच. ते काय करतील हे सांगण्यासाठी भविष्यकाराची गरज नाही.

पाथर्डी १३१ मते आहेत. आमदार मोनिका राजळे बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यासाठी ऋषिकेश ढाकणे व त्यांचे समर्थक यांनी उमेदवारी मागे घेतल्याची पार्श्वभूमीही चर्चेच्या आग्रभागी महत्त्वाची मानली जाते. ऋषिकेश ढाकणे भटक्या विमुक्त जमातीमधून विस्थापितांची उमेदवार आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पॅनलला कशी, व कोणाकडून अदृश्य मदत मिळते याकडे लक्ष असेल. शेवगाव ११७ मते आहेत. राजश्री चंद्रशेखर घुले बिनविरोध निवडून आल्या आहेत. विस्थापित गटातून महिला राखीव प्रवर्गात हर्षदा काकडे या स्थानिक उमेदवार आहेत. त्यांना शेवगाव मधून मदत होईलच मात्र इतर चार उमेदवारांना किती मदत होईल हे निकालानंतरच समजणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news