

शशिकांत पवार
नगर तालुका: पर्जन्यछायेचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर तालुक्यातील बळिराजाला नेहमीच वातावरणाच्या बदलाचा फटका बसत असतो. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला, तर वातावरणात तयार झालेले ढगाळ हवामान व धुक्यामुळे रब्बी पिके ही विविध रोगांच्या विळख्यात सापडली आहेत. त्यामुळे बळिराजा हवालदिल झाला असून, उत्पादन खर्च वाढून उत्पन्न मात्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तालुक्यात सुमारे 70 हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिके डोलावत होती. अनुकूल वातावरण व मुबलक पाणी यामुळे सर्वच रब्बी हंगामातील पिके मोठ्या जोमात होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, वाढलेले धुके व ढगाळ हवामानामुळे पिकांना विविध रोगांनी ग्रासले आहे. जोमात असलेली पिके रोगांच्या विळख्यात सापडल्याने बळिराजा चिंतेत पडला आहे. महागड्या औषधांची फवारणी व खतांचा वापर यामुळे उत्पादनखर्चात अतिरिक्त वाढ होणार आहे. तर रोगांमुळे उत्पन्नात मात्र घट असल्याने शेतकऱ्यासमोर नवे संकट उभे ठाकले आहे.
तालुक्यात सर्वदूर अतिवृष्टी झाल्याने सर्व तलाव, बंधारे, नाले तुडुंब भरले होते. सर्वत्र मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते. खरीप हंगाम अतिवृष्टीने वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला होता. खरीप हंगामाची भरपाई रब्बी हंगामात होईल या अपेक्षेवर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने रब्बी पिकांची पेरणी व कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. लाल कांद्याच्या हंगामात भाव गडगडलेले होते. त्यातच अतिवृष्टीमुळे लाल कांदा उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे चित्र दिसून येत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लाल कांद्याच्या उभ्या पिकात नांगर फिरवला. परंतु गावरान कांदा, गहू, हरभरा, लसूण, चारा पिके मोठ्या प्रमाणात घेण्यात आली.
रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा व गव्हाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्याचबरोबर गावरान कांद्याची लागवडही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. गुलाबी थंडी व पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिके मोठ्या जोमात होती. परंतु ढगाळ हवामान व धुक्यामुळे सर्वच पिकांना विविध रोगांनी ग्रासले आहे. औषधांची फवारणी, खताचा खर्च वाढून उत्पादनात घट होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
सद्यःस्थितीत गावरान कांदा, गहू, हरभरा, चारा पिके जोमात होती. परंतु चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व धुक्याचे प्रमाण वाढल्याने सर्वच पिकांना विविध रोगांनी ग्रासले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हातात उत्पन्न मिळेपर्यंत शाश्वती नाही.
राजू पवार, शेतकरी, जेऊर
पिकांवर पडलेले रोग
गहू: मावा, तांबेरा, ज्वारी: चिकटा, मावा, हरभरा: घाटी अळी, मर, कांदा/लसूण: मावा, तुडतुडे, मर, करपा, डाऊनी, मका: अमेरिकन लष्करी अळी, भाजीपाला टोमॅटो: अळी, डाऊनी, भेंडी: नागअळी, लाल कोळी, तसेच अळीचा प्रादुर्भाव, कोथिंबीर: भुरीचा प्रादुर्भाव, वांगे: अळीचा प्रादुर्भाव, मेथी: मावा, कोबी/फ्लॉवरः अळीचा प्रादुर्भाव.
ढगाळ हवामान व धुक्यामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य व्यवस्थापन, तसेच कृषितज्ज्ञांच्या सल्ल्याने उच्च दर्जाची कीटकनाशक, बुरशीनाशक औषधांची फवारणी करावी.
संदीप काळे, साईनाथ कृषी उद्योग