

डॉ. सूर्यकांत वरकड
नगर: अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुमारे 2200 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, स्वतःसह आई-वडिलांच्या आजारपणासह विविध कारणे देत तब्बल 468 कर्मचाऱ्यांनी इलेक्शन ड्युटी रद्द करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज केले आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी शहरात येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच 16 जानेवारी रोजी मतमोजणी होईल. मतदान प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. शहरातील मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सुमारे 2200 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, महापालिका कर्मचारी, बांधकाम, जलसंपदा, महसूल अशा विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी देण्यात आली आहे. महापालिका मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतंत्र आदेश काढले आहेत. ते आदेश कर्मचाऱ्यांना पोहोचही झाले आहेत.
विभागप्रमुखांवर जबाबदारी
बांधकाम, जलसंपदा, जिल्हा परिषद, महसूल, महापालिका अशा विविध विभागांतील 2200 कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातील अनेकांनी इलेेक्शन ड्युटी नको, असे अर्ज केले आहेत. आता त्या कर्मचाऱ्यांच्या जागी दुसरा कर्मचारी देण्याची जबाबदारी त्यांच्या विभागप्रमुखांवर देण्यात आली आहे. तक्रारीची शहानिशा करण्याची जबाबदारीही संबंधित विभागप्रमुखांवरच टाकण्यात आली आहे.
...तर कारवाई होणार
सुमारे 468 कर्मचाऱ्यांनी इलेक्शन ड्युटी नको असा अर्ज केला आहे. त्यांनी दिलेल्या कारणाची शहानिशा केली जाणार आहे. कारण योग्य असेल तर त्या कर्मचाऱ्यांची ड्युटी रद्द करण्यात येईल. मात्र, कारण सिद्ध झाले नाही, तर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
प्रशिक्षणाला 400 कर्मचारी गैरहजर
दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी इलेक्शन ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना पहिल्या प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले होते. त्यात तब्बल 400 कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. आता उद्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुसरे कर्मचारी प्रशिक्षण होणार आहे. त्या प्रशिक्षणास सर्व कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र आम्हाला इलेक्शन ड्युटीच नको, असे तब्बल 468 अर्ज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले आहेत. त्यात सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोणाच्या छातीत दुखतंय तर कोणाच्या पोटात दुखतंय. कोणाचे आई, वडील आजारी आहेत, तर कोणाची पत्नी, मुले आजारी आहेत. मुलांची परीक्षा आहे, अशी अनेक कारणे त्या अर्जांमध्ये देण्यात आली आहेत.
कारणे...
मी आजारी
छातीत दुखतंय
पोटात दुखतंय
आई-वडील आजारी
अपघात झालाय
पत्नी आजारी
मुलांची परीक्षा