

पाथर्डी: श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर देवस्थानतर्फे शांकभरी नवरात्रोत्सवाची सांगता पारंपरिक उत्साहात, वेदमंत्रांच्या जयघोषात व भक्तिभावाच्या वातावरणात पार पडली. हजारो भाविकांनी दिवसभर श्री मोहटादेवीचे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवानिमित्त सुरू असलेल्या सप्तशती पाठांची पूर्णाहुती होमहवनाने करण्यात आली.
मोहटा देवस्थानचे विश्वस्त ॲड. कल्याण बडे, संगीता बडे, श्रीकांत लाहोटी व कावेरी लाहोटी यांच्या हस्ते महापूजा व होमहवन करण्यात आले. यावेळी वेदमंत्रांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.देवस्थानमार्फत वासंतिक, शारदीय व शांकभरी अशी तीन नवरात्रे साजरी केली जातात. शांकभरी नवरात्रोत्सवात दररोज पारंपरिक धार्मिक विधी, त्रिकाल आरती, सुवासिनी पूजन, अन्नदान, तसेच शाकाहाराचे महात्म्य व उपयोगिता याबाबत देवी महात्म्यातील संदर्भ भाविकांना सांगण्यात आले. शांकभरी पौर्णिमेच्या दिवशी गावोगावच्या सुवासिनी विविध प्रकारच्या पालेभाज्या व पुरणपोळीचा महानैवेद्य देवीला अर्पण करतात.
नवसपूर्तीप्रित्यर्थ सुवासिनी जेवण घालण्याची परंपरा आजही श्रद्धेने जपली जाते. पौराणिक कथेनुसार, पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडल्यावर देवी भगवतीने ‘शाकंभरी’ अवतार धारण करून आपल्या शरीरातून भाज्या, फळे व धान्य निर्माण करून सृष्टीचे पोषण केले. या निमित्ताने निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते व अन्नधान्याची कमतरता भासू नये, यासाठी देवीकडे प्रार्थना केली जाते.या प्रसंगी सकल भारतवासीय देवीभक्तांचे उत्तम आरोग्य, धनधान्य, सुख-समृद्धी लाभो तसेच समाजात ऐक्य व प्रेमभाव निर्माण व्हावा, असा संकल्प करून देवीस प्रार्थना करण्यात आली.
होमहवन कार्यक्रमास परभणी येथील जिल्हा न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे, विश्वस्त ॲड. विक्रम वाडेकर, देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे, लेखापाल संदीप घुले, कर्मचारी, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे येथील देवीभक्त श्रीराम परतानी यांच्या वतीने अन्नदानाची पंगत देण्यात आली.
कार्यक्रमाचे पौरोहित्य भूषण साकरे, भास्कर देशपांडे, महेश झेंड, विशाल किडे, सार्थक दिवेकर, बाळासाहेब क्षीरसागर व भगवान जोशी यांनी केले. शांकभरी पौर्णिमेनिमित्त हरी कीर्तन, भजन तसेच भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.