

संगमनेर: शासनाने चिनी मांज्यावर बंदी घातली असतानाही संगमनेर नगरपालिका व पोलिस स्टेशनचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे राजरोसपणे चिनी मांज्याची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. त्यातच शहर व तालुक्यातील वेगवेगळ्या घटनांमध्ये चिनी मांज्यामुळे कापले गेल्याने चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
शहरात सध्या चिनी (नायलॉन) मांज्यामुळे घबराटीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने या मांज्यावर बंदी घातलेली असतानाही बाजारपेठेत खुले आम त्याची विक्री होत आहे. संगमनेर नगरपालिका व शहर पोलिस ठाण्याचे दुर्लक्ष झाल्याने त्याचा गैरफायदा विक्रेते घेत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. नाईकवाडपुरा येथील हुजेब रौफ शेख हा 23 वर्षीय तरुण बहिणीला दुचाकीवरून ट्युशनला सोडायला जात असताना त्याच्या गळ्यात मांज्या अडकला. प्रसंगावधान राखून त्याने मान फिरवली; मात्र यात त्याचा कान आणि गळा चिरून तो रक्तबंबाळ झाला.
दुसरी घटना उंबरी बाळापूर येथील प्रवीण सारबंदे यांच्याबाबत घडली. नायलॉन मांज्यामुळे त्यांच्या उजव्या हाताची बोटे कापली गेली असून, त्यांना कायमचे अपंगत्व येण्याची भीती निर्माण झाली आहे. तिसरी घटना जोर्वे नाका परिसरात घडली. एका सायकल चालकाचा पाय या मांज्यामुळे कापला गेला, तर चौथ्या घटनेत तर एका महिलेचा हात चिरला. या सर्व जखमींवर सध्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
नायलॉन मांज्याची विक्री आणि वापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश शासनाने दिले होते. मात्र, संगमनेरमध्ये या आदेशांना स्थानिक विक्रेत्यांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र दिसत आहे. पोलिस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बंदी केवळ कागदावरच उरली असून, अंमलबजावणी करणारी यंत्रणा आर्थिक संबंधामुळे गप्प आहे.
नायलॉन मांजामुळे केवळ मानवांचाच नाही, तर आकाशात भरारी घेणाऱ्या निष्पाप पक्ष्यांचेही बळी जात आहेत. नगरपालिका व पोलिस चिनी मांजा विक्रेत्यांवर कारवाई करणार का करत नाहीत, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.