Ahilyanagar Rain Update: अहिल्यानगरला पावसाचा दिलासा! मुळा धरणात 17 हजार क्युसेक आवक, भंडारदरा 74% भरले; 48 टँकर बंद

मुळा धरण 42 टक्क्यांवर पोहोचले, नांदूर मधमेश्वर व गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; पावसामुळे पाणीटंचाईत दिलासा
Bhandardara
BhandardaraPudhari
Published on
Updated on

राहुरी: मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. बुधवार (दि.२२ जुलै) सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुळा धरणातील पाणीसाठा ११ हजार ३१८ दलघफू इतका झाला. तर धरणाकडे १७ हजार २४३ क्युसेक वेगाने आवक सुरू होती. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

Bhandardara
Sangamner Urea Shortage: युरियासाठी शेतकऱ्यांचा संताप; संगमनेरमध्ये दीड तास महामार्ग रोखला, थोरातांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित

यंदा मान्सूनच्या सुरुवातीला मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नव्हता. परिणामी खरीप हंगाम अडचणीत आला होता. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या लांबणीवर टाकल्या, तर काहींना दुबार पेरणीचा खर्च सहन करावा लागला. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आणि मुळा धरणाच्या उगम भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ओढे, नाले आणि नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्याचा थेट परिणाम धरणाच्या वाढत्या आवकेवर दिसून येत आहे.

Bhandardara
Parner ZP School Teacher Shortage: २०० विद्यार्थ्यांच्या शाळेत शिक्षकच नाहीत! पारनेरच्या मांडवे खुर्दमध्ये आजपासून उपोषण

अंबितला 105 मि.मी. पावसाची नोंद

बुधवारी सकाळी पाणलोट क्षेत्रात सर्वत्र मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली होती. अंबित येथे तब्बल १०५ मिमी, खडकी येथे ९५ मिमी, लव्हाळी येथे ५८ मिमी, कोतुळ येथे १६ मिमी, डोळासणे येथे १६ मिमी, चास येथे १५ मिमी, घारगाव येथे १० मिमी, मुळानगर येथे ८ मिमी आणि सावरचोळ येथे ७ मिमी पावसाची नोंद झाली.

१७ हजार क्युसेकने आवक सुरू

26 टीएमसी क्षमता असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठ्यावरच शेतीचे संपूर्ण गणित अवंलबून असते. त्यामुळे पावसाळा आला की शेतकऱ्यांना धरणातील पाणीसाठ्याची ओढ लागते. आज धरणात 42 टक्के पाणीसाठा झाला आहे. 17 हजाराची आवक सुरू आहे, पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे लवकरच धरण 50 टक्क्याच्या पुढे भरणार आहे. आणखी मोठे पाऊस बाकी आहेत. त्यामुळे यावर्षीही धरण भरणार असल्याचा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांचे धरणातील आवक आणि धरणातील पाणीसाठा याकडे लक्ष असल्याचे दिसते आहे.

नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत ७,९२४ क्युसेक्सने पाणी

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक लक्षणीय वाढली आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात ७,९२४ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण असून, पाऊस पडत आहे. हा पाऊस खरीप पिकांच्या वाढीस पोषक ठरत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Bhandardara
Shrigonda Hotel Closure: श्रीगोंद्यात अनैतिक व्यापारावर मोठी कारवाई; दोन हॉटेले बंद करण्याचे आदेश

गंगापूर धरणातूनही विसर्ग

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार सुरू असल्याने बुधवार (दि. २२ जुलै) दुपारी ३ वाजता गंगापूर धरणातून १९९ क्युसेक्सने पूरपाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पावसाचा जोर कायम राहिल्यास किंवा वाढल्यास हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

भंडारदरा धरणात दोन दिवसांत एक टीएमसी पाण्याची आवक

गेल्‍या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्‍याने भंडारदरा धरणात १ हजार ३४ दलघफू इतकी नवीन आवक झाली. त्‍यामुळे भंडारदरा धरण ७४ टक्‍के भरले आहे. निळवंडे धरणातही १८५ दलघफूची आवक झाल्‍याने ते ३८ टक्‍के भरले आहे. १५ ऑगस्‍टपूर्वी ओव्‍हर फ्‍लो होण्‍यासाठी आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

दहा बारा दिवसांनंतर भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणांच्‍या पाणलोट क्षेत्रात पावसानेहजेरी लावली आहे. गेल्‍या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. २० जुलै रोजी सकाळी ६ वाजता भंडारदरा धरणात ७ हजार ९० दलघफू इतका पाणीसाठा उपलब्‍ध होता. २१ जुलै रोजी ४५ तर २२ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत भंडारदरा येथे १२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय रतनगड येथे १७४, घाटघर येथे १८५, पांजरे येथे १६०, वाकीत १२२तर कोतूळ येथे १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्‍यामुळे भंडारदरा, निळवंडे धरणांत पाण्‍याची आवक सुरु आहे.

बुधवारी (दि.२२)सकाळी सहा वाजता भंडारदरा धरणात ८ हजार १२४ दलघफू तर निळवंडे धरणात ३ हजार १५१ दलघफू इतका पाणीसाठा उपलब्‍ध होता. त्‍यामुळे आजमितीस भंडारदरा धरण ७४ टक्‍के इतके भरल्‍याची नोंद आहे.

Bhandardara
Nagar Taluka Gram Panchayat Elections: नगर तालुक्यात ६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल; दिवाळीपूर्वी गावोगावी रंगणार राजकीय रणधुमाळी

५९ गावांना पावसाचा दिलासा; ४८ टँकर बंद

गेल्‍या सतरा अठरा दिवसांत जिल्ह्यात पावसाची बर्‍यापैकी नोंद झाली. अकोले, संगमनेर व पारनेर तालुक्‍यांत पाऊस झाल्‍याने अकोले तालुका टँकरमुक्‍त झाला. संगमनेर तालुक्‍यातील तीन तर पारनेर तालुक्‍यात २६ टँकर कमी झाले आहेत. एकंदरीत जिल्‍हाभरातील ४८ टँकर बंद झाले आहेत. मात्र, दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील ११६ गावे आणि ६२० वाड्यांत पाणीटंचाईच्‍या झळा कायम आहेत. त्‍यामुळे ११४ टँकरव्‍दारे २ लाख ३२ हजार लोकसंख्‍येला पाणीपुरवठा सुरु आहे.

यंदा मार्च महिन्‍यापासून टँकर सुरु आहेत. जून महिन्‍यात ३९ मिलिमीटर तुटीचा पाऊस झाला. त्‍यामुळे ५ जुलैपर्यंत जिल्‍हाभरातील संगमनेर, अकोले, नेवासा, नगर, पाथर्डी, पारनेर, कर्जत, जामखेड व शेवगाव या नऊ तालुक्‍यांतील १७५ गावे आणि ९४६ वाड्यांत पाणीटंचाई सुरुच होती. या टंचाईग्रस्‍त गावांतील सव्‍वातीन लाख लोकसंख्‍येला १६२ टँकरव्‍दारे पाणीपुरवठा सुरु होता.

जुलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्यात संगमनेर, अकोले, पारनेर तालुक्‍यांत जोरदार पाऊस झाला. त्‍यामुळे अकोले तालुक्‍यातील १७ गावे आणि ५३ वाड्यांतील पाणीटंचाई दूर होऊन ९ टँकर बंद झाले आहेत.

गेल्‍या काही दिवसांपासून कमी अधिक पाऊस सुरुच आहे. त्‍यामुळे पारनेर शहरासह १७ गावे २१४ वाड्यांतील टंचाई परिस्‍थिती दूर झाली आहे. एकंदरीत गेल्‍या पंधरा दिवसांत पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावल्‍यामुळे टंचाईग्रस्‍त ५९ गावे आणि ३२६ वाड्यांतील पाणीपातळीत सुधारणा झाली. त्‍यामुळे ४८ टँकर बंद होण्‍यास मदत झालेली आहे.

मात्र, अद्यापही दमदार पावसाची नोंद नसल्‍यामुळे नगर, पाथर्डी, जामखेड, कर्जत, शेवगाव व नेवासा आदी तालुक्‍यांत पाणीटंचाई सुरुच आहे. २१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ११६ गावे आणि ६२० वाड्यांत पाणीटंचाई सुरुच असल्‍याचा अहवाल आहे. त्‍यामुळे या गावांसाठी अद्याप ११४ टँकरव्‍दारे मोफत पाणीपुरवठा सुरुच आहे. गेल्‍या दीड महिन्‍यांत एक दोन वेळाच दमदार पाऊस झाला. त्‍यामुळे भूजलपातळीत म्‍हणावी अशी वाढ झालेली नाही. त्‍यामुळे जनता दमदार पावसाच्‍या प्रतीक्षेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news