

शशिकांत पवार
नगर तालुका: तालुक्यातील तब्बल ६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून, गेली दोन वर्षे प्रशासकांच्या हाती असलेला गावकारभार आता लोकप्रतिनिधींकडे सोपविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने ग्रामीण भागातील राजकारण तापण्यास सुरुवात होणार आहे. गावोगावी इच्छुकांची लगबग, बैठका, पॅनेल जुळवाजुळव आणि राजकीय समीकरणांना वेग येणार असून, प्रत्येक गावात निवडणुकीचा माहोल रंगणार आहे.
जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपलेल्या ६७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. २४ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर आता मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम संगणक प्रणालीद्वारे सुरू झाले आहे. तहसील प्रशासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीची विधानसभा व प्रभागनिहाय माहिती संकलित करून प्रणालीवर अपलोड केली जात आहे. तालुक्यात २०२६मध्ये मुदत संपलेल्या ६०, तर २०२४मध्ये मुदत संपलेल्या ७ अशा एकूण ६७ ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासकांमार्फत कारभार सुरू आहे. निवडणुका रखडल्याने अनेक गावांतील विकासकामांचा वेग मंदावल्याची भावना नागरिक आणि इच्छुक उमेदवार व्यक्त करत आहेत.
लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्याने गावपातळीवरील प्रश्न सोडविण्यात अडचणी येत असल्याची चर्चा ग्रामीण भागात आहे. राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यामुळे रखडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे दिवाळीच्या उत्सवी वातावरणातच गावकीच्या निवडणुकांचा धुरळा उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
६७ गावांत राजकीय रणधुमाळी!
पिंपळगाव माळवी, धनगरवाडी, दरेवाडी, हमीदपूर, वाकोडी, निमगाव घाणा, शिंगवे नाईक, हिवरेबाजार, नवनागापूर, निमगाव वाघा, देहरे, पिंपळगाव वाघा, कर्जुनेखारे, चास, निंबळक, कामरगाव, विळद, अकोळनेर, पिंपरी घुमट, भोरवाडी, इसळक, घोसपुरी, बाराबाभळी, चिचोंडी पाटील, वडारवाडी, मांडवे, शहापूर केकती, सांडवे, नागरदेवळे, दशमीव्हाण, माथणी, टाकळी काझी, खांडके, कोल्हेवाडी, बुऱ्हाणनगर, आंबिलवाडी, वारुळवाडी, हातवळण, देवगाव, मठपिंप्री, रतडगाव, रुईछत्तिशी, पोखर्डी, गुणवडी, इमामपूर, वाळुंज, ससेवाडी, पारगाव मौला, बहिरवाडी, शिराढोण, उदरमल, वाटेफळ, मांजरसुंबा, तांदळी वडगाव, डोंगरगण, खडकी, खोसपुरी, खंडाळा, जेऊर, गुंडेगाव, भोयरे पठार, भोयरे खुर्द, पारेवाडी, पारगाव भातोडी, आव्हाडवाडी, मजले चिंचोली, बुरुडगाव या गावांनी निवडणुकीचा रणसंग्राम पाहावयास मिळणार आहे.
दोन वर्षांपासून अनेक ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांकडे आहे. लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्याने विकासकामांचा पाठपुरावा कमी झाला आहे. गावांच्या सर्वांगीण विकासासाठी रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका तातडीने घेणे आवश्यक आहे.
बापूसाहेब आव्हाड, माजी सरपंच, पांगरमल