

नगर: अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत 63 जागांसाठी 283 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात राष्ट्रवादी भाजप युतीच्या पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, माजी महापौर सुरेखा कदम यांच्यासह अनेकांचे भवितव्य ईव्हीएम बंद झाले.
आज सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून, पहिल्या मतदानयंत्राचे टुंगटुंग वाजणार आहे. दरम्यान सर्व 17 प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी एकूण 68 टेबलांवर होणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. सुमारे 12 वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महापालिका निवडणुकीसाठी तिरंगी लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युती, शिवसेना, शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांची महाविकास आघाडी, मनसे, बसपा, आप अशा विविध पक्षाने उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. त्यात अनेक दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कुमार वाकळे, प्रकाश भागानगरे तर, भाजपचे करण कराळे, पुष्पा बोरूडे, सोनाबाई शिंदे असे पाच जण बिनविरोध झाले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर सुरेखा कदम, माजी उपमहापौर गीतांजली काळे, माजी महापौर शीला शिंदे यांचे पती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी सुनीता फुलसौंदर, योगीराज गाडे, सुभाष लोंढे, निखील वारे, ॲड. धनंजय जाधव, अविनाश घुले, गणेश कवडे, सचिन जाधव, समद खान, मुद्दसर शेख, नज्जू पैलवान, सुभाष लोंढे, संजय शेंडगे, डॉ. सागर बोरूडे, मनोज कोतकर, नितीन शेलार, काका शेळके यांचे भवितव्य मतपेटी बंद झाले आहे. आता कोणाचा विजय होणार हे आज मतमोजणीनंतर कळणार आहे.
मैत्रिपूर्ण लढतींकडे लक्ष
प्रभाग एकमध्ये भाजपच्या उमेदवार शारदा ढवण व राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती ढवण यांच्या मैत्रिपूर्ण लढतीने प्रभागात चुरस पाहायला मिळाली. प्रत्यक्षात गुलाल कोणाचा हे आज मतमोजणीनंतर समजणार आहे. प्रभाग 11 मध्ये राष्ट्रवादी व भाजपाच्या मैत्रिपूर्ण लढतीकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
बसपाच्या एंट्रीने रंगत
प्रभाग 11 मध्ये भाजप, शिवसेना, उबाठा सेना, अपक्ष यांच्यासह बसपाने उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने निवडणुकीत रंगत पाहायला मिळाली. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत खेचून आणण्यासाठी उमेदवारांचे कार्यकर्ते व प्रतिनिधींना मोठी कसरत करावी लागली.