

नगर: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत आज सकाळी खळबळजनक प्रकार समोर आला. सावेडी उपनगरातील आनंद विद्यालयातील मतदान केंद्रावर दोघांना बनावट मतदान ओळखपत्राच्या आधारे मतदान करण्यासाठी आलेल्या दोघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून सुमारे 50 ते 60 बोगस मतदार कार्ड ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अदखपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. गणेश कुंडलिक शेकडे (वय 34, रा. म्हसोबाचीवाडी, ता. आष्टी, जि. बीड, सतीश नवनाथ शेकडे रा. म्हसोबाचीवाडी ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. नागापूर, ता. जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत शिवसेनेचे उमेदवार काका शेळके यांच्या यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, मी स्वतः शिवसेनेकडून प्रभाग तीनमध्ये महापालिका निवडणूक लढवीत आहे. गुरुवारी (दि. 15) रोजी मतदान प्रक्रिया सुरू असताना मी व कार्यकर्ते सुनील हिवाळे पारिजात चौकात गेलो. काही लोक मतदारांना कार्ड देत असल्याचे दिसून आले. त्याचा संशय आल्याने जवळ जाऊन पाहिले असता ते मतदान कार्ड (मतदार ओळखपत्र) देत होते. त्यातील एकाला लगेच पकडले असता अन्य दोघे पळून गेले. पकडलेल्या तरुणाच्या खिशातून मतदान कार्ड काढून घेतले. त्याला नाव-गाव विचारण्याआधीच तो काही कार्ड घेऊन पळून गेला. त्याच्याकडे सापडलेल्या कार्डमध्ये शेकडे, आंधळे, ढाकणे, मिसाळ अशा आडनावाचे कार्ड सापडले.
त्यानंतर तत्काळ आनंद शाळेतील मतदान केंद्रावर धाव घेतली असता मतदान करण्याकरिता आलेले गणेश शेकडे, सतीश शेकडे यांना राहण्याचा पत्ता विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पत्ता सांगता आला नाही. महापालिका निवडणुकीमध्ये गैरवाजवीपणे प्रभाव पाडण्यासाठी बनावट मतदान कार्डच्या आधारे बोगस मतदान करण्याचा प्रयत्न आढळून आला, असे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिस कसून चौकशी करणार
मतदानादरम्यान प्रभाग क्रमांक 3 मधील आनंद विद्यालय मतदान केंद्र परिसरात बनावट ओळखपत्रांबाबत समोर आलेल्या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित संशयित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती प्रभाग क्रमांक 3 चे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली आहे.
नाव नोंदविणारा सूत्रधार कोण
संबंधित तरुणांकडे सापडलेले सर्व मतदान कार्ड हे आष्टी तालुक्यातील आहेत. त्यांचा राहण्याचा पत्ता शहरामधील दिसत नाही. ताब्यात घेतलेल्या दोघांना पत्ता सांगता येत नाही. शहराच्या मतदार यादीमध्ये या लोकांची नावे कोणी नोंदविली, या बनावट मतदान कार्डचा मुख्य सूत्रधार कोण याचा पोलिसांनी शोध घेणे गरजेचे आहे.
हजार कार्ड असल्याचा संशय
शिवसेनेचे उमेदवार काका शेळके यांनी पारिजात चौकात कार्ड वाटप करताना एकास पकडले मात्र, अन्य दोघे पळून गेले. त्यांच्याकडे सुमारे एक हजार कार्ड असल्याचा संशय असल्याचे काका शेळके यांनी म्हटले आहे.
सापडलेले बनावट कार्डांवरील नावे अशी
विष्णू भगवान बडे, काशीबाई संदीप बडे, गणेश बाळासाहेब ढाकणे, संजय बयाजी आंधळे, रंगनाथ कारभारी घुले, अनिता महादेव घुले, सचिन बाबासाहेब बांगर, सोनाली बाबासाहेब बडे, परमेश्वर त्रिंबक मिसाळ, संकेत पोपट ढाकणे, बापू परमेश्वर मिसाळ, सूरज विष्णू बडे, लताबाई बाळासाहेब ढाकणे, करण आनंदा बढे, श्रीराम साहेब बडे, बाबासाहेब महादेव बडे, दत्तात्रय पर्वत होडशिळ, महादेव ढमाजी घुले, साक्षी महादेव मिसाळ, विठठल पोपट खाडे, सतीष नवनाथ शेकडे, सानिका संजय आंधळे, गणेश कुंडलिक शेकडे, सरस्वती दत्तात्रय होडशिळ, अमोल जगन्नाथ आंधळे, सोनाली बाबासाहेब बडे, मिरा विष्णू बडे, बाबासाहेब शहादेव बढे, ज्ञानदेव साळेराम सारुक, तुषार बाबासाहेब बढे, विठ्ठल बबन बढे.