

नगर: आखाती देशांतील युद्धाचे पडसाद जिल्ह्यातील घराघरांत उमटू लागले आहेत. आगामी काळात सिलिंडरची टंचाई निर्माण होईल, या भीतीपोटी नागरिकांचा सिलिंडर पदरात पाडून घेण्यासाठी आटापिटा सुरू असून, नगर शहरासह जिल्हाभरातील गॅस एजन्सींपुढे नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. नागरिकांची वाढती गर्दी रोखण्यासाठी काही ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, गॅस एजन्सीच्या कामात अडथळा निर्माण केला, कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्यास अथवा सिलिंडरच्या गाड्या अडवून काही नुकसान केल्यास संबंधित नागरिकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
गेल्या दहा-बारा दिवसांपासून आखाती देशांत युद्ध सुरू आहे. याची झळ घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरला बसली आहे. घरगुती सिलिंडरला प्राधान्य देण्यासाठी व्यावसायिक वापर होणाऱ्या सिलिंडरचा पुरवठा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम हॉटेल, खानावळी तसेच छोट्या-मोठ्या उद्योगांवर होऊ लागला आहे. त्यामुळे काळ्या बाजारात या सिलिंडरच्या किमती चार हजारांवर पोहोचल्या आहेत.
युद्ध काळात देखील घरगुती सिलिंडर सर्वसामान्य जनतेला उपलब्ध व्हावे, यासाठी इंधन कंपनी आणि जिल्हा प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. एक घरगुती सिलिंडर असलेल्या कुटुंबाला आता 25 दिवसांनी, तर दोन सिलिंडर असलेल्या कुटुंबाला 30 दिवसांनी नोंदणी करण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे मोठ्या कुटुंबाला याचा फटका बसणार आहे. जिल्हाभरात 110 गॅस एजन्सी आहेत. यामध्ये नगर शहरातील 12 एजन्सींचा समावेश आहे. त्यामुळे शहरासह जिल्हाभरातील गॅस एजन्सींवर सिलिंडरसाठी नागरिकांच्या रांगा दिसत आहेत.
नंबर लागत नाहीत..
घरगुती सिलिंडरचा तुटवडा नाही, असे इंधन कंपनीचे अधिकारी तसेच जिल्हा प्रशासन एकीकडे सांगत आहे. तर दुसरीकडे बुकिंग होत नाही, बुकिंग झाले तरीही सिलिंडर उपलब्ध होत नाही. जिल्हा प्रशासनाने तक्रारींसाठी प्रसिद्ध केलेले नंबर लागत नाहीत. अशा तक्रारी घरगुती सिलिंडर ग्राहकांच्या आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील गॅस एजन्सीसमोर रांगा दिसत आहेत. यामध्ये नगर शहरातील 12 एजन्सींवर अशीच परिस्थिती गेल्या दोन दिवसांपासून आहे.
केवायसी नसणाऱ्यांना अडचणी
केवायसी असणाऱ्या सिलिंडर ग्राहकांनाच प्राधान्य देण्यात आलेले आहे. अशा नागरिकांचीच बुकिंग केली जात आहे. ज्या व्यक्तींचे केवायसी नाही अशा ग्राहकांना सिलिंडर मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे गॅस एजन्सी कर्मचारी आणि नागरिकांत बाचाबाची आणि वादावादीच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे राहाता तालुक्यातील काही गॅस एजन्सीमध्ये पोलिस बंदोबस्तात सिलिंडरचे वितरण सुरु आहे.
एजन्सीवर कारवाई..अवघड जागेचे दुखणे
जिल्हाभरातील बहुतांश गॅस एजन्सी राजकीय पदाधिकारी वा त्यांच्या नातेवाइकांच्या आहेत. सिलिंडर विक्री वा वितरण हे नियमांनुसार व्हावे अशी अपेक्षा आहे. परंतु बहुतांश ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना तपासणी करताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. त्यामुळे अशा एजन्सींवर कारवाई करणे ‘अवघड जागेचे दुखणे’ असल्याचे एका अधिकाऱ्याने खासगीत म्हटले आहे.
इलेक्ट्रिक शेगडीही महागली
सध्याच्या परिस्थितीत हवे तेवढे सिलिंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांबरोबरच हॉटेल व्यावसायिकांनी स्वयंपाकासाठी इलेक्ट्रिक शेगडीला प्राधान्य दिले आहे. शेगडी घेण्यासाठी बाजारात गर्दी होऊ लागली. वाढती गर्दी बघता इलेक्ट्रिक दुकानदारांनी किमती वाढविल्या आहेत. अठराशे रुपयांची शेगडी अडीच ते तीन हजार रुपयांनी खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
काळ्या बाजारात दीड-दोन हजारांचा दर
आखाती देशांतील युद्ध स्थिती कधी आटोक्यात येईल याचा भरवसा नसल्याने नागरिक आणखी एक दोन सिलिंडर जवळ असावेत यासाठी एजंटला हाताशी धरून काळ्या बाजारातून सिलिंडर खरेदी करण्याचा निर्णय घेत आहेत. त्यामुळे दीड - दोन हजार रुपये या चढ्या भावाने सिलिंडर विकत घेतले जात आहे. व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा असल्याने हॉटेलचालक व इतर व्यावसायिकांनी देखील घरगुती सिलिंडर चढ्या भावाने घेऊन व्यवसाय सुरू ठेवल्याचे दिसत आहे.