

नगर/कर्जत: चापडगाव (ता. कर्जत) येथे स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलिसांना आफूच्या शेतीचा मळा आढळून आला. पोलिसांनी संबंधित शेतकऱ्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 47 लाख 64 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 10 मार्च रोजी करण्यात आली. याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना चापडगाव (ता. कर्जत) येथे आफूची शेती असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना केल्या.
त्यानुसार कबाडी यांनी उपनिरीक्षक अनंत सालगुडे, समीर अभंग, पोलीस अंमलदार दीपक घाटकर, विजय पवार, अतुल लोटके, संतोष खैरे, अमृत आढाव, चालक उत्तरेश्वर मोराळे, अर्जुन बडे यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले. तसा रिपोर्ट कर्जतचे सहायक पोलिस निरीक्षक विजय झंजाड यांना दिला. त्यानुसार विजय झंजाड, पोलिस अंमलदार संजय सानप, किरण जाधव, सचिन थोरात यांच्यासह कारवाईसाठी रवाना झाले.
पथकाने शेतात छापा घातला असता अफूचे पीक मोठ्या प्रमाणात रांगेत आढळून आली. परमेश्वर बन्सी घनवट (वय 68, रा. चापडगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) तेथे राखण करत असल्याचे दिसले. दोन ते तीन महिन्यांपासून शेतात अफूची लागवड केल्याचे त्याने सांगितले.
पोलिसांनी शेतातून 238.239 किलो वजनाची अफूची झाडे जप्त केली असून त्याचे बाजारमूल्य 47 लाख 64 हजार 180 रुपये असल्याचे सांगण्यात आले. पोलिस अंमलदार श्यामसुंदर जाधव यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत पोलिस गुन्ह्याचा तपास करीत आहेत.