Ahilyanagar Highway Accident: अहिल्यानगर जिल्ह्यात भीषण अपघातांची मालिका; खड्डे, दुरुस्ती आणि बिघाडामुळे ३ ठार, ९ गंभीर जखमी

नगर-मनमाड महामार्गावर महिलेचा मृत्यू, जामखेडजवळ दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा बळी; घारगाव येथे ट्रक-कार अपघातात नऊ जण गंभीर
Accident
AccidentPudhari
Published on
Updated on

कोल्हार खुर्द/गुहा/राहुरी : नगर-मनमाड राज्य महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून रविवारी (दि. १९) आणखी एका महिलेचा रस्त्यावरील खड्ड्यांनी बळी घेतला. महामार्गावरील कोल्हार खुर्द येथे सकाळी नऊच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि पाठीमागून येणाऱ्या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली. त्यात दुचाकीवरील ज्योती माळी (वय ५५, रा. नरसाळी, ता. श्रीरामपूर) ट्रकखाली सापडून जागीच ठार झाल्या. दुचाकी चालविणारा त्यांचा मुलगा आणि चिमुरडी नात सुदैवाने या अपघातातून बचावले.

Accident
Pandharpur Ashadhi Ekadashi ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटी सज्ज! अहिल्यानगर विभागातून पंढरपूरसाठी ४३० जादा बस धावणार

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ज्योती माळी काल सकाळी ९ वाजता आपल्या मुलासोबत आणि नातीसोबत दुचाकीवरून बाहेरगावी निघाल्या होत्या. कोल्हार खुर्द येथील साई ध्यानमंदिर परिसराजवळ आले असता, रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात पाठीमागून वेगाने आलेल्या ट्रकची त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती, की दुचाकीवर मागे बसलेल्या ज्योती माळी या खाली पडल्या आणि ट्रकखाली सापडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालक मुलगा आणि नात रस्त्याच्या कडेला फेकले गेल्यामुळे सुदैवाने बचावले.

Accident
Rahuri Minor Marriage Case: राहुरीत अल्पवयीन मुलींच्या विवाहाची दोन धक्कादायक प्रकरणे; पतींसह १३ जणांवर गुन्हे

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लोणी येथे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.

अपघातांनी अनेक संसार उद्ध्वस्त

नगर-मनमाड राज्य महामार्ग आता प्रवाशांसाठी जीवनवाहिनी नसून  मृत्यूचा सापळा  ठरत असल्याची भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांत या महामार्गावर झालेल्या सलग भीषण अपघातांनी अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे  नगर-मनमाडची साडेसाती संपता संपत नाही,  अशी संतप्त चर्चा सुरू आहे.

पुन्हा प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्न

डिग्रस फाटा येथे १७ जुलै  रोजी कार आणि ॲपे रिक्षाच्या भीषण अपघातात  चांगुनाबाई पवार  यांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत  कोल्हार खुर्द  येथे कंटेनरच्या धडकेत  माळी  यांचा जागीच मृत्यू झाला. या दोन घटनांनी पुन्हा एकदा या महामार्गाच्या सुरक्षित प्रवासाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे.

Accident
Pathardi Crime: पाथर्डी पोलिस ठाण्यातून बलात्कार प्रकरणातील संशयित फरार? पोलिस कर्मचाऱ्यावर मदतीचा गंभीर आरोप

जामखेडजवळ अपघातात दोन शासकीय कर्मचारी ठार टेम्पो-कारची टक्कर

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ‘५४८डी’वर पाटोदा (गरडाचे) परिसरात रविवारी (दि. १९) पहाटे टेम्पो व कार यांची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. श्रीगोंदा तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक विकील बहुरे आणि कुकडी पाटबंधारे उपविभाग (करमाळा) येथील मोजणीदार रामचंद्र बहुरे अशी त्यांची नावे आहेत. दुरुस्तीसाठी वाहतूक एकाच बाजूने सुरू ठेवल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो (एमएच १४ बीजे २२८३) आणि कार (एमएच२० जीई ३५६२) यांच्यात पाटोदा येथे जोरदार धडक झाली. अपघातानंतर १०८ रुग्णवाहिकेद्वारे दोघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

पाटोदा-रत्नापूर दरम्यान महामार्गावर पडलेल्या भेगांमुळे दुरुस्तीचे काम सुरू असून, एका बाजूची वाहतूक बंद करून एकेरी वाहतूक सुरू होती. याच ठिकाणी हा अपघात घडल्याने दुरुस्तीच्या कामाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महामार्गावरील निकृष्ट दर्जाचे काम आणि अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे यापूर्वीही या मार्गावर अनेक अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण इंगळे करीत आहेत. या भीषण अपघातानंतर संबंधित कंत्राटदाराच्या कामाच्या गुणवत्तेची चौकशी करून निष्काळजीपणा आढळल्यास कठोर कारवाई करावी, तसेच महामार्गावरील दुरुस्तीची कामे सुरक्षित पद्धतीने पूर्ण करून वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Accident
Shrirampur Traders Police Protection: व्यापाऱ्यांना धमक्या देणाऱ्यांची गय नाही; ‘पोलिस तुमच्या पाठीशी’, एसपी मुम्मका सुदर्शन यांचे आश्वासन

घारगावजवळ अपघातात ९ जण गंभीर जखमी

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर घारगाव परिसरातील १९ मैल येथे भरधाव ट्रकचा ॲक्सल रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रक विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेल्याने पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या कारला जोरदार धडक बसली. या अपघातात कारमधील नऊ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना संगमनेर व आळेफाटा येथे रुग्णालयांत दाखल करण्यात आले. यात काही लहान मुलांचा समावेश आहे. प्रकाश सोमनाथ पालवे (वय ४० चालक), विष्णू फासाळे, भगवान एकनाथ फासाळे, भगवान नवसू फासळे व हिराबाई रमेश पालवे (सर्व रा. गिरणारे, जि. नाशिक) व आणखी चार जणांचा (नावे समजू शकली नाहीत) जखमींमध्ये समावेश आहे. हा अपघात मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास घडला.

महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे यांनी सांगितले की, ट्रकचालक कुंदन कुमार मन्सा चौहान (रा. उत्तर प्रदेश) ट्रक (एमएच १५ जेसी ३९८३) घेऊन हा नाशिकहून पुण्याकडे भरधाव जात असताना ट्रकचा ॲक्सल रॉड तुटला. चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक थेट दुसऱ्या विरुद्ध मार्गावर गेला. त्याच वेळी पुण्याहून नाशिककडे जात असलेल्या कारला (एमएच १५ जीएल ९०२७) ट्रक धडकला. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. ट्रकचा पुढील भाग दबला गेला. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक व कार बाजूला करण्यात आली. या अपघातामुळे रस्त्यावर ऑइल तसेच सामान अस्ताव्यस्त पडले होते. बराच वेळ वाहतूक विस्किळत झाली होती. महामार्ग पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी विलास धात्रक व त्यांच्या पथकानेही जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news