

नगर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले असून, अहिल्यानगर विभागाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी २० जुलैपासून ४३० जादा बसची व्यवस्था केली आहे. सध्यादेखील पंढरपूरसाठी महामंडळाच्या नियमित बस हाऊसफूल धावत आहेत.
२० जुलै रोजी सप्तमी असून, या दिवशी आषाढी यात्रेस प्रारंभ होत आहे. या दिवसापासून अहिल्यानगर विभागाच्या वतीने ३० जुलैपर्यंत २८० जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय धुळे विभागाच्या ७५ व जळगाव विभागाच्या ७५ बसचे नियोजन केले. एकंदरीत अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविकांसाठी ४३० जादा बस पंढरपूर यात्रेसाठी धावणार आहेत.
या जादा बस प्रत्येक आगारातून सुटणार असून, या बस तारकपूर बसस्थानकात थांबणार आहेत. भाविकांसाठी जादा बसची सेवा २४ तास उपलब्ध असणार आहे. मात्र, शेवगाव, पाथर्डी, जामखेड व श्रीगोंदा या चार आगारांच्या बस माहिजळगाव मार्गे पंढरपूरकडे जाणार आहेत.
पंढरपूर यात्रेसाठी जाणार्या जादा बस पंढरपूर येथील विठठल साखर कारखाना यात्रा केंद्रावरील शेड क्रमांक ३ येथे थांबणार आहेत. दर्शनानंतर परतीसाठी तेथूनच बस सुटणार आहेत. भाविकांनी मागणी केल्यास गावातूनही बसचे नियोजन केले जाणार आहे. मात्र, गावापासून भाडे आकारणी केली जाणार आहे. भाविकांनी या जादा बसव्दारेच प्रवास करावा असे आवाहन अहिल्यानगर विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी केले आहे.
आगारनिहाय जादा बसची संख्या
तारकपूर ३१, शेवगाव २४, जामखेड २२, श्रीरामपूर २६, कोपरगाव ३४, पारनेर २१, संगमनेर २८, श्रीगोंदा ३३, नेवासा २१, पाथर्डी २४, अकोले १६.