

नगर: महामार्गाच पण रस्त्यावर पडलेले गुडघाभर खड्डे... खाचखळग्यातून वाट काढताना चालकांची होणारी कसरत... अनेक वर्षापासून रेंगाळलेले काम... नगर ते छत्रपती संभाजीनगर व मनमाड महामार्ग नव्हे तर मृत्यूमार्ग असल्याची प्रचिती अनेकांना आलीय. या दोनच महामार्गावर वर्षभरात झालेल्या अपघातात 254 निष्पापांचा बळी गेलाय.
जिल्ह्यात संभाजीनगर रस्ता, मनमाड रस्ता, जामखेड रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न अनेक दिवसांपासून गाजत आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि इतर मार्गावर रस्ते अपघातात वर्षभरात 1042 जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यात दोष कोणाचा याचा शोध घेण्यापेक्षा रस्ते अपघातात एक हजारांच्यावर जीव जाणे ही चिंतेची बाब आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातून सात राष्ट्रीय मार्ग जातात. त्यात दौंड-मनमाड, पुणे -नाशिक, कल्याण-विशाखापट्टणम, पुणे-संभाजीनगर, अहिल्यानगर- सोलापूर, अहिल्यानगर - जामखेड, समृद्धी - महामार्गाचा समावेश आहे. तसेच राज्य मार्ग आणि अन्य मार्गही मोठ्या प्रमाणात आहे. राष्ट्रीय महामार्गातील नगर ते मनमाड मार्ग व अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्ग गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. दोन्ही महामार्गाची पूर्णपणे वाताहत झाली आहे. रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी ब्लॉक स्पॉट तयार झाले आहेत. नगर - मनमाड रस्त्यावर राहुरीजवळ वारंवार अपघात होत आहेत. नगर - मनमाड रस्त्याचे काम सुरू आहे पण अनेकदा ठेकेदार बदलल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. तीच परिस्थिती संभाजीनगर रस्त्याची आहे. संभाजीनगर रस्ता राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.
मात्र, अद्यापि रस्त्याचे हस्तांतरण झालेले नाही. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून, वारंवार अपघाताचे प्रमाण वाढले आहे. जामखेड रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. आता त्या रस्त्याचे काम सुरू आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह विविध मार्गावर 892 अपघातात एक हजार 42 जणांचा जीव गेला आहे. रस्ते अपघाताची कारणे वेगवेगळी असली तरी केवळ रस्त्यावर 1042 जणांना जीव गमवावा लागला आहे. अनेक ठिकाणी ब्लॉक स्पॉट तयार झाले आहे. वाहतूक पोलिसांकडून ब्लॉक स्पॉट कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. गत वर्षभरात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जिल्ह्यात 3 हजार 411 जणांना वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना पकडले. त्यांच्याकडून 45 लाख 5 हजारांचा दंड वसूल केला. तर, गतवर्षात 438 जणांना मद्य प्रशान करून वाहन चालविल्यामुळे पोलिसांनी कायद्याचा हिसका दाखविला. त्यांच्याकडून एक लाख 90 हजारांचा दंड वसूल केला. जिल्ह्यात 1645 जणांनी हेल्मेटविना वाहन चालविले. त्यांच्याकडून 16 लाख 58 हजारांचा दंड वसूल केला.
राज्यमार्गासह अंतर्गत रस्त्यावरील होताहेत अपघात
राष्ट्रीय महामार्गावरील मनमाड आणि संभाजीनगर रस्त्यावर सार्वधिक अपघात झाले असून, 254 जणांचा बळी गेला आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या सात राष्ट्रीय महामार्गावर गतवर्षात 396 अपघात झाले तर, त्यात 418 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील राज्य मार्ग व इतर मार्गावर 496 अपघात झाले असून, 624 जणांना मृत्यूला कवटाळले आहे.
जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. दिशादर्शक पालक यासह ब्लॉक स्पॉट कमी करण्यावर भर आहे. प्रवाशांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर