

चिचोंडी पाटील: नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात साध्या वेशातील पोलिस पथकाने केलेली तथाकथित धडाकेबाज कारवाई अखेर फज्जा ठरली. म्हसोबावाडी परिसरातील एका व्यक्तीच्या वाहनात अवैध पदार्थ असल्याची माहिती असल्याचा दावा करत कथित पोलिसांनी चिचोंडी पाटील येथे छापा टाकला. मात्र चारचाकी वाहनापासून घरातील कपाटांपर्यंत सर्व काही पालथे घालूनही काहीच हाती न लागल्याने ही कारवाई केवळ दिखाऊ आणि संशयास्पद असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली.
गोपनीय माहितीच्या नावाखाली कोणतीही खात्री न करता, कोणालाही विश्वासात न घेता संबंधित पथकाने थेट घरी धाव घेतली. अचानक झालेल्या झाडाझडतीमुळे कुटुंबीय भयभीत झाले. परंतु बराच वेळ चाललेल्या तपासणीनंतरही अवैध पदार्थ तर दूरच, साधा संशयास्पद कागदही सापडला नाही. परिणामी कथित पोलिसांची वेगवान कारवाई प्रत्यक्षात निष्काळजीपणाचे दर्शन घडवणारी ठरली. या छाप्यात अनेक नियम आणि कायदे धाब्यावर बसवल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. सदर कारवाईची पोलिस कंट्रोल रूममध्ये नोंदच नव्हती का, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. घर तपासणीवेळी आवश्यक असलेले पंच साक्षीदार व महिला पोलिसांची अनुपस्थिती हा गंभीर नियमभंग मानला जात आहे. इतकेच नव्हे तर कोणतेही शोध वॉरंट, आदेश किंवा अधिकृत कागदपत्रे न दाखवता थेट घरात घुसखोरी केल्याचा आरोप संबंधित कुटुंबीयांनी केला आहे.
तपासणीत काहीही न सापडूनही नील पंचनाम्याची प्रत देण्यास पथकाने टाळाटाळ केल्याने संशय अधिकच बळावला आहे. याशिवाय सरकारी वाहन न वापरता खासगी वाहनाने संबंधित पोलिस अधिकारी घटनास्थळी कसे आले, हा प्रश्नही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण कारवाई रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास सुरू होती आणि त्यात कायद्याने ठरवलेल्या मर्यादा पायदळी तुडवल्या गेल्याचा आरोपही होत आहे.
दरम्यान, पोलिस पथकाच्या उपस्थितीची बातमी गावात पसरताच लोकप्रतिनिधी व नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यांनी थेट जाब विचारताच पथकातील अधिकारी निरुत्तर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे गोपनीय माहिती हा केवळ बेकायदेशीर कारवाईला दिला जाणारा सोयीस्कर बहाणा तर नाही ना, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. निष्पाप नागरिकांचा मानसिक छळ करून कायदा हातात घेणाऱ्या या कारवाईची वरिष्ठ पातळीवर तातडीने चौकशी व्हावी, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे. अन्यथा अशा बेजबाबदार कारवायांमुळे पोलिस यंत्रणेवरील जनतेचा विश्वास ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रात्रीची झडती - कायदा पायदळी?
रात्री बेरात्री घरात घुसून झडती घेताना महिला अधिकारी उपस्थित नसणे, ही बाब कायद्याच्या चौकटीत बसते का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 100 व 165 नुसार घराची झडती घेताना पंच साक्षीदारांची उपस्थिती आवश्यक असून, घरात महिला असतील तर महिला पोलिस अधिकारी किंवा शिष्टाचाराचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. महिला अधिकारी नसताना पुरुष अधिकाऱ्यांनी थेट घरात प्रवेश करून झडती घेणे हे कायदा धाब्यावर बसविण्यासारखे मानले जाते. त्यामुळे या बेजबाबदारपणासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पोलिस ठाण्याचा अजब सल्ला!
कथित पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या या बेकायदेशीर कारवाईची तक्रार नोंदवण्यासाठी पीडित व्यक्ती नगर तालुका पोलिस ठाण्यात गेली, मात्र तेथे न्याय मिळण्याऐवजी अजबच सल्ला देण्यात आल्याचे समजते. ‘आत्ता साहेब नाहीत. उद्या या; साहेबांना भेटूनच तक्रार घेऊ’ असे सांगत तेथील पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्याची माहिती पीडित व्यक्तीने दिली. कायद्याने तक्रार तत्काळ नोंदवणे अपेक्षित असताना, जबाबदारी झटकण्याची ही भूमिका पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे.
रात्रीची धडक, महिलांचा आक्रोश!
कथित पोलिस अधिकारी रात्री अचानक घरात झडतीसाठी घुसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. अंगावर गणवेश नसणे व गळ्यात ओळखपत्र न दिसल्यामुळे घरात अज्ञात व्यक्ती शिरल्याचा संशय निर्माण झाला. त्यामुळे घरातील महिलांनी घाबरून आरडाओरडा केला. या गोंधळात एका महिलेला तीव्र धक्का बसून ती बेशुद्ध पडल्याचे सांगण्यात येते. अचानक आणि ओळख न पटणाऱ्या पद्धतीने झालेल्या या कारवाईमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, छापा टाकणारे खरेच पोलिस अधिकारी असतील, तर त्यांच्या बेजबाबदार वर्तनाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आणि जर ते पोलिस नसतील, तर गंभीर दखल पोलिस प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी होत आहे.