मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्यात पक्ष्यांना जगणे सुसह्य व्हावे, या हेतूने बागलाण सायकलिस्ट ग्रुपने 'ओंजळभर पाणी, मूठभर धान्य' हा उपक्रम होती घेतला आहे. अंतःकरणात पशू-पक्ष्यांविषयी भूतदया आणि अरण्यात पशू-पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून देणे, हे मनुष्याचे कर्तव्य आहे, या संत तुकाराम महाराजांच्या उपदेशाला अनुसरून हा उपक्रम राबविला जात आहे. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी झाडांना मातीचे भांडे टांगून ओंजळभर पाणी व नारळाच्या करवंटीत धान्य टाकण्यात येते. भाक्षीजवळील डोंगर परिसरात सर्वप्रथम अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात स्थानिकांनाही सहभागी करून घेत त्यांना पालकत्व देण्यात येणार आहे.
काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्णता जाणवत आहे. उष्मा आणि पाण्याअभावी पक्षी बेशुद्ध पडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. उन्हाळ्यात पक्ष्यांना नैसर्गिक खाद्य दुर्मीळ होते. तसेच नैसर्गिक पाण्याचे स्रोतही कोरडे पडतात. पाण्याच्या शोधात असताना वाढत्या उन्हामुळे पक्ष्यांना भोवळ येत असते. चालू महिना अधिक आव्हानात्मक असेल, असे एकूण चित्र आहे. आजघडीला तापमान 40 अंशांवर गेले आहे. उकाडाही वाढला आहे. तेव्हा मुक्या जिवांसाठी काहीतरी केले पाहिजे, या विचारातून बागलाण सायकलिस्टच्या सदस्यांनी या उपक्रमाला चालना दिली.
या उपक्रमात डॉ. विशाल आहिरे, बाळासाहेब देवरे, बागलाण सायकल ग्रुपचे उपाध्यक्ष मोहनराव सूर्यवंशी, रवींद्र भदाणे, महेंद्र महाजन, मोहन सोनवणे, हेमंत भदाणे, चंद्रशेखर देवरे, दीपक सोनवणे, हितेश देसले, नितीन जाधव, प्रशांत रौंदळ, वैभव पाटील, वैष्णव बच्छाव, श्वास आहिरे, राजेंद्र सोनवणे, विकी खरोटे, मयूर जाधव, सुदर्शन सोनवणे, ओम सोनवणे, सिद्धेश भदाणे आदींनी सहभाग घेतला.