कोल्हापूर : मित्राला फिरायला नेऊन केला खून, तारदाळच्या युवकाचा देवरूख घाटात गेम | पुढारी

कोल्हापूर : मित्राला फिरायला नेऊन केला खून, तारदाळच्या युवकाचा देवरूख घाटात गेम

तारदाळ : पुढारी वृत्तसेवा

तारदाळ (ता. हातकणंगले) येथील महादेव ऊर्फ दादासो किसन निगडे (वय 30) याला मित्रांनी फिरायला नेऊन देवरूख घाटात त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. संशयितांमध्ये रावण गँगचा म्होरक्या सुरज मेहबूब चिकोडे (वय 25) याच्यासह गणेश राजेंद्र शिवारे (30) प्रतीक बापूसो कोळी (17, रा. तारदाळ) या तिघांना देवरूख पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी संशयित आरोपी सुरज चिकोडे याच्या घरावर मृत दादासोचे नातेवाईक व ग्रामस्थांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी लाठीमार करत जमाव पांगविला. दादासो निगडे हा 16 एप्रिल रोजी देवदर्शनासाठी घरातून निघून गेला होता. तो परत न आल्याने त्याच्या आईने शहापूर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी दादासो याची पत्नी सौ. रेश्मा निगडे हीदेखील घरातून न सांगता निघून गेल्याची फिर्याद शहापूर पोलिस ठाण्यात नोंद आहे.

मयत दादासोच्या मोबाईल लोकेशन, कॉल रेकार्ड यावरून देवरूख पोलिसांनी तपास गतिमान करत खुनाचा उलगडा केला. दि. 8 मे रोजी रात्री देवरूख पोलिसांनी संशयित मारेकर्‍यांना ताब्यात घेतले. नातेवाईकांना दादासो निगडे याची कपड्यावरून ओळख पटली. नातेवाईकांनी आक्रोश केला. मयताचे नातेवाईक हे देवरूखहून घराकडे येताच गावामध्ये नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. या भीषण घटनेमुळे शिवाजी चौकात तणावाचे वातावरण होते. घटनास्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी डी.वाय.एस.पी. बी.बी. महामुनी, शहापूर पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील आदींनी घटनास्थळी भेट देऊन मृताच्या नातेवाईकांची समजून काढत मारेकर्‍यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास गतिमान करीत असल्याचे आश्वासन दिले.

मुख्य संशयित रावण गँगचा मोरक्या

या खुनातील मुख्य संशयित आरोपी सुरज चिकोडे याची चौकात पानपट्टी आहे. तो अनेक अवैध व्यवसाय करीत असल्याची चर्चा आहे. सुरज हा रावण गँगचा म्होरक्या असून त्याने या परिसरात दहशत निर्माण केली होती.

Back to top button