उषःकाल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे रुग्णांसाठी विश्वसनीय केंद्र : डॉ. प्रतापसिंह जाधव | पुढारी

उषःकाल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे रुग्णांसाठी विश्वसनीय केंद्र : डॉ. प्रतापसिंह जाधव

सांगली : पुढारी वृत्तसेवा सांगलीतील उषःकाल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे पश्चिम महाराष्ट्रातील गरजू रुग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, उपचारांचे विश्वसनीय केंद्र उपलब्ध झाले असल्याचे प्रतिपादन दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केले.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सांगली-धामणी रस्त्यानजीक असलेल्या उषःकाल अभिनव हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली. डॉ. जाधव यांनी या ठिकाणी असलेल्या विविध सुविधा, उपचारांसाठी सज्ज यंत्रणा, आयसीयू, ऑपरेशन थिएटर्स, विविध वैद्यकीय विभाग आदींची माहिती घेतली. सर्व रोगांचे अतिप्रगत उपचार येथे होणार असल्याचे त्यांनी स्वागत केेले. सामान्यांना परवडणार्‍या दरात येथे वैद्यकीय सेवा मिळत असल्याबाबत त्यांनी गौरवोद्गार काढले. अशा स्वरूपाचे हॉस्पिटल सांगलीत सुरू झाल्याबद्दल डॉ. जाधव यांनी समाधान व्यक्त
केले.

उषःकाल अभिनवचे संचालक डॉ. मकरंद खोचीकर यांनी या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची माहिती दिली. ते म्हणाले, मार्चमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व जलमार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या हॉस्पिटलचे उद्घाटन झाले.

युरॉलॉजिस्ट डॉ. मकरंद खोचीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, हॉस्पिटलचे संचालक मंडळ यांच्या योगदानातून परिपूर्ण उषःकाल अभिनव हॉस्पिटल उभारले आहे. यातून रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा दिली जात आहे. यावेळी डॉ. मिलिंद परीख, डॉ. संजय कोगरेकर आदी उपस्थित होते.

Back to top button