नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीत वकिलांनी मतदान केलेल्या मतपत्रिका गहाळ झाल्याची तक्रार पराभूत उमेदवारांनी सरकारवाडा पोलिसांकडे केली आहे. त्याचप्रमाणे मतमोजणी पुन्हा घेण्यासह मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत लवादाकडेही तक्रार केली आहे.
नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी (दि.8) सायंकाळी पूर्ण झाली. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी व पराभूत उमेदवार घरी गेले होते. मात्र, मतपत्रिकांचा हिशेब जुळत नसल्याची, मतपत्रिका मोजण्यात गफलत झाल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला व ते पुन्हा न्यायालयात आले. त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. मात्र निवडणूक निर्णय अधिकार्यांनी त्यांचा अर्ज स्वीकारला नाही. याबाबत अध्यक्षपदाचे उमेदवार अॅड. महेश आहेर यांनी आरोप केला आहे की, एकूण झालेल्या मतदानानुसार सर्व उमेदवारांना पडलेली मते व बाद मते मिळूनही एकूण मतदानाचा आकडा जुळत नाही. त्यामुळे मतपत्रिका गहाळ झाल्याचे उघड झाले आहे. अनेक पदांच्या मतपत्रिका गहाळ झाल्या असून, त्यातही तफावत आढळून येत असल्याने मतमोजणीबाबत विरोधकांनी संशय निर्माण केला आहे. मतपत्रिका गहाळ झाल्याची कोणत्याही उमेदवारास कल्पना देण्यात आली नाही किंवा मतमोजणीपूर्वी त्यांची लेखी संमती घेतली नाही.
मतमोजणी केंद्रावरील प्रतिनिधींवर दबाव टाकल्याचाही आरोप अॅड. आहेर यांनी केला. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक नव्हती. 11 मतमोजणी केंद्र असताना एकच प्रतिनिधी ठेवण्याची मुभा होती. त्यामुळे इतर 10 केंद्रांवर मतमोजणीत फेरफार झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अॅड. आहेर यांनी सांगितले. मतपत्रिका गहाळ झाल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून, लवादातही तक्रार केल्याचे अॅड. आहेर, अॅड. शरद मोगल, अॅड. अनिल आहुजा आदींनी सांगितले.
नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीत अन्याय झाल्याचे वाटत असल्यास किंवा आक्षेप असल्यास संबंधितांनी कायदेशीर मार्गाने लढा द्यावा.
– अॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष, नाशिक बार असोसिएशन