Nashik News : बेवारस वाहने उचलण्याची मनपाची घोषणा हवेतच, आता दिलं ‘हे’ कारण | पुढारी

Nashik News : बेवारस वाहने उचलण्याची मनपाची घोषणा हवेतच, आता दिलं 'हे' कारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-शहरातील रस्त्यांवर बेवारस उभी असलेली वाहने उचलण्याची महापालिकेची घोषणा पंधरा दिवसातच हवेत विरली आहे. सदर वाहने हटविण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निमूर्लन विभागाकडे कुठलीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने गेल्या पंधरा दिवसात एकही कारवाई होऊ शकलेली नाही. वाहने उचलण्यासाठी महापालिकेला टोईंग ठेकेदार नियुक्त नेमावा लागणार असून, त्यानंतरच प्रत्यक्ष कारवाईला प्रारंभ होऊ शकणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १२ जानेवारीला नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. मोदींनी या दौऱ्यात श्री काळाराम मंदिरात दर्शन घेत अयोध्येतील राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले. इतकेच नव्हे तर, त्यांनी स्वत: काळाराम मंदिराच्या आवारात स्वच्छताही केली होती. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने संपूर्ण शहरात विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यास सुरूवात केली. ३१ जानेवारीपर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे. ‘डीप क्लिनिंग’ असे या स्वच्छता मोहिमेला नाव देण्यात आले आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून शहरातील विविध रस्त्यांवर, गॅरेजसमोर बेवारस उभी असलेल्या व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याची घोषणा महापालिकेने केली. यासाठी महापालिकेने कलम २३० व २४३ अनुसार शहरातील बेवारस वाहनांचे मालक-चालक गॅरेजधारक व वापरकर्त्यांना जाहीर नोटीस बजावली. महापालिका हद्दीतील रस्ते, पुल, फुटपाथ, उड्डाणपुलाखालील भागात बेवारस सोडून दिलेली वाहने संबंधित मालकांनी आठ दिवसात स्वत:हून न हटविल्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने या नोटीसीद्वारे दिला होता. त्यास पंधरा दिवसाचा कालावधी उलटला तरी महापालिकेने कुठलीही कारवाई केली नाही.

वाहने उचलण्यासाठी नेमणार ठेकेदार

कारवाई संदर्भात अतिक्रमण निमूर्लन विभागाचे उपायुक्त नितीन नेर यांना विचारले असता या कारवाईसाठी अतिक्रमण निमूर्लन विभागाकडे कुठलीही यंत्रणा उपलब्ध नाही. बेवारस वाहने उचलण्यासाठी टोईंग ठेकेदार नेमला जाईल. त्यानंतरच प्रत्यक्ष कारवाईला सुरूवात होईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button