‘सोमेश्वर’च्या उपाध्यक्षपदी कोणाला संधी? | पुढारी

‘सोमेश्वर’च्या उपाध्यक्षपदी कोणाला संधी?

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा :  सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या नवीन उपाध्यक्षांची निवड शुक्रवारी (दि. 2) होत असून, कोणाला संधी मिळणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात शुक्रवारी कारखाना कार्यालयात संचालक मंडळाची बैठक पार पडणार आहे. विद्यमान उपाध्यक्षा प्रणिता खोमणे यांचा उपाध्यक्षपदाचा वर्षभराचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पाच वर्षांत पाच उपाध्यक्ष होणार असल्याने पाच संचालकांना या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हेच अंतिम निर्णय घेणार असून, ते आपले मत कोणाच्या पारड्यात टाकतात, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे येथील उपनिबंधक सहकारी संस्थेच्या शीतल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक 12 ऑक्टोबर 2021 ला पार पडली होती. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनेल व सोमेश्वर परिवर्तन पॅनेलमध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने एकहाती विजय मिळवला होता. बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण या चार तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्षपद मिळावे यासाठी इच्छुक संचालकांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तरुण, अभ्यासू, सहकारातील जाण असलेल्या तरुण संचालकांना संधी मिळते की ज्येष्ठ संचालकांना संधी मिळणार हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. सुरुवातीला आनंदकुमार होळकर आणि त्यांनंतर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच महिला संचालक प्रणिता खोमणे यांना उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली होती.

पुन्हा एकदा धक्कातंत्र
आगामी लोकसभा, विधानसभा तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्षाचे काम करणार्‍या संचालकालाच संधी मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे धक्कातंत्र वापरत पुरंदर की बारामती तालुक्याला संधी देतात का, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

Back to top button