नाशिक शहरातील ७८ वस्त्यांची जातिवाचक नावे बदलली, विरोध करणाऱ्यांचे प्रबोधन करणार

नाशिक शहरातील ७८ वस्त्यांची जातिवाचक नावे बदलली, विरोध करणाऱ्यांचे प्रबोधन करणार
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या निर्देशांनुसार नाशिक शहरातील ७८ वस्त्या, ३ रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्यात आली आहेत. दरम्यान, काही ठिकाणी वस्त्यांची नावे बदलण्यास स्थानिकांनी विरोध केल्याची माहिती महापालिकेने विभागीय महसुल आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर केली आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रबोधन करण्याचे निर्देश विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.

पूर्वी अनेक वस्त्या, पाडे तसेच रस्त्यांना जातिवाचक नावे दिली जात असत. सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीकोनातून सदरची जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय राज्याच्या समाज कल्याण विभागाने घेतला आहे. यासाठी मे २०२१ मध्ये कायदा पारित करून राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्‍त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भातील परिपत्रक महापालिकेच्या समाजकल्याण विभागाला प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने शहरातील रस्ते व वस्त्यांची नावे बदलण्यासाठी सहा विभागीय अधिकाऱ्यांना जातीवाचक नावे असलेल्या वस्त्या, रस्ते व चौकांचे नावे शोधण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शहरात ७८ जातीवाचक वस्त्या आणि ३ रस्त्यांची नावे आढळून आली होती. त्यानंतर महापालिकेने यासंदर्भात नावे बदलण्याचा प्रस्ताव महासभेनेही मंजूर केला होता; परंतु, सदरचे नावे बदलण्यास विरोध असल्यामुळे पालिकेने ही प्रक्रिया थांबवली होती. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेंच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी (दि.३१) विभागस्तरीय बैठक पार पडली. त्यात शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी महापालिकेने केलेल्या कारवाईचा आढावा सादर करत, स्थानिकांकडून नावे बदलण्यास विरोध केला जात असल्याचे समितीच्या निदर्शनास आणून दिले. यावादावर तोडगा काढण्यासाठी लोकांचे मतपरिवर्तन करा व प्रबोधन करून नावे बदलण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश गमे यांनी पालिकेला दिले आहेत.

अशी आहेत गल्ल्यांची जातीवाचक नावे (कंसात बदललेले नाव)

– पूर्व विभाग- जुनी तांबट गल्ली (ओंकार लेन), कुंभारवाडा (भूमी नगर), माळी गल्ली (निसर्ग गल्ली), तेली गल्ली ( रामशेज गल्ली), मातंग वाडा (स्वाभिमान नगर), राजवाडा (प्रगती नगर), कोकणीपुरा (जनता नगर), कोळीवाडा (कौशल्य नगर ), माळी गल्ली (निर्मल गल्ली), बुरुड गल्ली (यशवंत गल्ली), जोगवाडा (शरयू नगर), मुलतानपुरा (शहिद नगर), साळी गल्ली (शांतीनगर), काजीपुरा (इन्कलाब नगर), वैदुवाडी (अहिंसा नगर), आदिवासी वाडा (क्रांतीनगर), माळी गल्ली (उपासना नगर), रामोशी वाडा (सहकार नगर).

पश्चिम विभाग- नवीन तांबट लेन (संस्कृती लेन), लोणार लेन (विवेक लेन), मातंग वाडा (मुक्ती वाडा) ख्रिश्चन वाडी (जयपूर नगरी), कुंभार वाडा (धरती नगर), साळीवाडा (स्नेह नगर ), जुने तांबट लेन (चैतन्य लेन) काजीगडी (गोदागडी).

पंचवटी विभाग– वैदुवाडी (पैनगंगा नगर), मांगवाडा (नर्मदा नगर), धनगर गल्ली (जय हिंद नगर), जोशी वाडा (रायगड नगर), तांबोळी नगर (वेदश्री नगर), भराडवाडी (रायरेश्वर नगर), वडारवाडी (रामशेज नगर), मोठा राजवाडा (सिंधू नगर), नाथ गल्ली (आनंदी नगरी), पाथरवट लेन (कमल नयन लेन), कोमटी गल्ली (देवगिरी नगरी), भोईवाडा (जनस्थान नगर), कुंभार गल्ली (कलाकृती नगर), चांभार गल्ली (त्रिकटक नगर), कोळीवाडा (हुतात्मा नगर).

नाशिक रोड विभाग– बौद्ध वाडा (समता नगर) गोसावी नगर (आराधना नगर), गवळीवाडा (राधानगरी), बौद्ध नगर (नालंदा नगर), लिंगायत कॉलनी (तक्षशिला कॉलनी), गोसावी वाडी (जुईनगर), धोबी गल्ली (कल्पवृक्ष नगर), महावीर नगर (रायगड नगर), जैन कॉलनी (सम्यक नगर), बौद्धवाडा (गोकुळधाम), मांगवाडा (गोवर्धन नगर), धनगर गल्ली ( टायगर गल्ली), तेली गल्ली (प्रगती नगर), भोई गल्ली (विकास नगर), वाल्मीक नगर (निर्माण नगर), कुंभार गल्ली (कुशल नगर), चांभारवाडा (क्रांती नगर), लोहार गल्ली (कामगार नगर).

सिडको विभाग- हाजी नगर (खुशबू नगर) झेनत नगर ( महेक नगर) हरदास कॉलनी (गुंजन कॉलनी), भिलवाडा (सहजीवन नगर), कोळीवाडा (श्रमिक नगर), कोळीवाडा (कर्मयोगी नगर), विश्वकर्मा (आविष्कार नगर).

सातपूर विभाग- कोळीवाडा (गोदावरी नगर), जोशी वाडा (रायगड नगर), कोळीवाडा (सागर वाडा), कोळीवाडा (अंजनेरी नगर), माळी कॉलनी (मयूर कॉलनी), कोळीवाडा (नंदिनीनगर)

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news