लोकसभेसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू, धुळ्यात 27 जानेवारीला आढावा बैठक | पुढारी

लोकसभेसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू, धुळ्यात 27 जानेवारीला आढावा बैठक

धुळे : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रीय काँग्रेस अलर्ट झाली असून उत्तर महाराष्ट्र स्तरीय जिल्ह्यांची आढावा बैठक दि. 27 जानेवारी रोजी धुळ्यात घेण्यात येणार आहे. या बैठकीत काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी आणि नेते हजेरी लावणार असून या सर्व जिल्ह्यांचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान धुळे लोकसभेसंदर्भात तीन जण इच्छुक असून त्यांची माहिती वरिष्ठ स्तरावर देण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी दिली आहे.

धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसंगी काँग्रेसचे शहर अध्यक्ष डॉक्टर अनिल भामरे, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, मजूर फेडरेशनचे राजेंद्र भदाणे यांची उपस्थिती होती. यावेळी उत्तर महाराष्ट्र विभाग जिल्हा निहाय आढावा बैठकीची माहिती देताना सनेर यांनी सांगितले की, या बैठकीस काँग्रेस पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची विशेष उपस्थिती राहील. त्याचप्रमाणे विधिमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोकराव चव्हाण तसेच सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील हे सहभागी होणार आहेत. या बैठकीत जिल्हा निहाय आढावा घेतला जाणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

देशातील वाढती सांप्रदायिकता, अन्यायाविरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा प्रारंभ केली आहे. त्यांच्या प्रयत्नाला बळ द्यायला हवे. भाजपा सक्षम नसल्यानेच ईडी, सीबीआय व इतर यंत्रणाचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर दबाव टाकला जातो. इतर पक्षातील आमदार, खासदार फोडून सत्ता मिळवण्यासाठी अनेक खटपटी केल्या जातात. त्यांना देशाच्या विकासापेक्षा सत्ता महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका महत्त्वाच्या असून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकांसाठी सज्ज झालो आहोत, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. राज्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे नेतृत्व कमी पडते, त्यामुळेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक वेळेस महाराष्ट्रात यावे लागते. हे राज्याच्या भाजपाचे अपयश असून राज्यात नेतृत्व कमी पडते आहे. त्यांना सर्वे मध्ये अपयश दिसत असल्याने हा सर्व खटाटोप सुरू आहे. पण राज्यातली जनता डोळस असून सत्तेच्या माध्यमातून येणाऱ्या दबावाला ती बळी पडणार नाही. निकालात याचे परिणाम दिसतील, असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला. धुळे लोकसभेसाठी आता स्वतः श्याम सनेर, मालेगावचे तुषार शेवाळे तसेच सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुर्रहेमान यांनी इच्छा व्यक्त केली आहे. ही तीनही नावे काँग्रेसच्या वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आली असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.

हेही वाचा

Back to top button