भारताच्‍या ‘फिरकी’ची कमाल, इंग्‍लंड ‘बेहाल’! पहिला डाव 246 धावांमध्‍ये गुंडाळला | पुढारी

भारताच्‍या 'फिरकी'ची कमाल, इंग्‍लंड 'बेहाल'! पहिला डाव 246 धावांमध्‍ये गुंडाळला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि इंग्‍लंडमधील पाच सामन्‍यांच्‍या कसाेटी मालिकेतील पहिल्‍या सामन्‍यात भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा. आर. अश्‍विन  आणि अक्षर पटेल यांनी इंग्‍लंडच्‍या फलंदाजांची ‘फिरकी’ घेतली.  इंग्‍लडचा पहिला डाव केवळ 246 धावांमध्‍ये गुंडाळला गेला. बेन स्‍टोक्‍स याने कर्णधाराला साजेसा खेळ करत 70 धावा केल्‍या. भारताच्‍या वतीने रवींद्र जडेजाने 3, अश्‍विनने 3, अक्षर पटेलने दोन, बुमराहने दोन बळी घेतले.

इंग्लंडची आक्रमक सुरुवात; पण अवघ्‍या चार षटकांमध्‍ये गमावल्‍या तीन विकेट

इंग्‍लडचा कर्णधार बेन स्‍टोक्‍स याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर जॅक क्रोली आणि बेन डकेट यांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी चार षटकात २५ धावा केल्या. मात्र इंग्लंडला पहिला धक्का 12व्या षटकात 55 धावांवर बसला. अश्विनने बेन डकेटला यष्‍टीचीत ( एलबीडब्ल्यू) केले. डकेट याने ३९ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ३५ धावा केल्‍या. १५ व्‍या षटकामध्‍ये फिरकीपटू रवींद्र जडेजाच्‍या गोलंदाजीवर ऑली पोपने रोहितकडे झेल दिला. त्‍याने केवळ १ धावेचे योगदान दिले. यानंतर पुढील षटकात फिरकीपटू अश्‍विनच्‍या गोलंदाजीवर फटकेबाजीच्‍या प्रयत्‍नात असणार्‍या क्रॉलीचा सिराजचे अप्रतिम झेल घेतला. क्रॉलीने ४० चेंडूत २० धावा केल्‍या.

अक्षरने फाेडली जो रूट आणि जॉनी बेअरस्टोची जोडी

जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्‍लंडचा डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यांची लंचनंतर ५० धावांची भागीदारीही झाली. मात्र ३३ व्‍या षटकामध्‍ये अक्षर पटेल याने ही जोडी फोडली. अक्षरच्‍या फिरकीवर बेअरस्‍टो त्रीफळाचीत ( क्‍लीन बोल्‍ड) झाला. १२१ धावांवर इंग्‍लंडला चाैथा धक्‍का बसला. बेअरस्‍टोने ५८ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. यामध्‍ये ५ चौकारांचा समावेश होता.

केवळ १२५ धावांवर इंग्‍लंडचा निम्‍मा संघ तंबूत

इंग्लंडला 125 धावांवर पाचवा धक्का बसला. रवींद्र जडेजाने जो रूटला जसप्रीत बुमराहकडे झेलबाद केले. त्याने 60 चेंडूत 29 धावा केल्‍या. यानंतर इंग्लंडला 137 धावांवर सहावा धक्का बसला. अक्षर पटेलने बेन फॉक्सला यष्टिरक्षक श्रीकर भरतकरवी झेलबाद केले. त्‍याने केवळ चार धावांचे योगदान दिले. इंग्लंडला 155 धावांवर सातवा धक्का बसला. जसप्रीत बुमराहनेही रेहान अहमदला यष्टिरक्षक केएस भरतकडे झेलबाद करून खाते उघडले.

रूट भारताविरुद्ध कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

रुटने भारताविरुद्धच्या 26 सामन्यांच्या 46 डावांत 62.31 च्या सरासरीने 2,555 धावा केल्या आहेत. तो भारत-इंग्लंड कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला (2,535) मागे टाकले आहे. रुट आता भारताविरुद्ध संयुक्तपणे सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने रिकी पाँटिंगची (2,555) बरोबरी केली आहे.

जडेजाचे तिसरे यश, टॉम हार्टलेन तंबूत

जडेजाने ५६ व्‍या षटकात २३ धावांवर खेळणार्‍या टॉम हार्टलेनला क्‍लीन बोल्‍ड करत इंग्‍लंडला आठवा धक्‍का दिला.

स्टोक्सची संघर्षपूर्ण फलंदाजी

सतत पडणाऱ्या विकेट्समध्ये स्टोक्सने संघर्षपूर्ण फलंदाजी केली. त्याने खालच्या फळीतील टॉम हार्टलीसोबत 38 धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 200 च्या जवळ नेली. यानंतर त्याने मार्क वुडसोबत 9व्या विकेटसाठी 41 धावा जोडल्या. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 31 वे अर्धशतक झळकावले आणि शेवटपर्यंत झुंज दिली. तो 88 चेंडूत 70 धावा करून बाद झाला.

अशी झाली भारताची गोलंदाजी

जसप्रीत बुमराहने 8.3 षटकात 28 धावा देत 2 बळी घेतले. फिरकी गोलंदाजांच्या वर्चस्वात, मोहम्मद सिराजने फारशी गोलंदाजी केली नाही आणि त्याला एकही बळी घेता आला नाही. जडेजाने विरोधी फलंदाजांची खडतर परीक्षा घेतली आणि 3 बळी घेतले. अश्विनने 68 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षरनेही प्रभावी मारा केला आणि 33 धावा देत 2 फलंदाजांना माघारी धाडले.

भारतीय  संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, एस. भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार)

 

 

Back to top button