Nagar : कोरठण खंडोबाचा आजपासून यात्रोत्सव | पुढारी

Nagar : कोरठण खंडोबाचा आजपासून यात्रोत्सव

कान्हूरपठार : पुढारी वृत्तसेवा : पिंपळगाव रोठा (ता.पारनेर) येेथील ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त कोरठण खंडोबाच्या यात्रोत्सवास आजपासून (दि. 25) प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष शालिनी घुले व उपाध्यक्ष महेश शिरोळे, राजेंद्र चौधरी यांनी दिली. आज (गुरुवारी) पहाट पहाटे 4 वाजता खंडोबा देवाला मंगलस्नान, पूजा, चांदीच्या सिंहासनाचे व चांदीच्या उत्सव मूर्तीचे अनावरण होईल. त्यानंतर सकाळी 6 वाजता आमदार नीलेश लंके, राणी लंके, तहसीलदार गायत्री सौंदाणे यांच्या हस्ते अभिषेक, महापूजा, महाआरती होऊन यात्रेतील भाविकांना दर्शनासाठी मंदिरे खुले होईल.

दिवसभर तळीभंडार व देवदर्शन चालू राहील. दुपारी 4 वाजता कोरठण खंडोबा पालखी गावात मुक्कामी जाईल. रात्री गावात पालखी छबीना मिरवणूक होईल. शुक्रवारी (दि 26) सकाळपासून देवदर्शन सुरू होईल. खंडोबा पालखीचे नवीन शाही रथातून गांवातून प्रस्थान होऊन खंडोबा मंदिराकडे पालखी सोहळा येईल. दहा वाजता बैलगाडा घाटाचे पूजन होईल. संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथून आलेल्या खंडोबा मानाची पालखीची मिरवणूकव देवदर्शन कार्यक्रम होईल. सायंकाळी खंडोबा देवाचा पालखी छबीना मिरवणूक होईल. शनिवारी श्रदि 27) यात्रेचा मुख्य दिवस आहे. सकाळी 8 वाजता खंडोबाच्या चांदीची पालखी आणि अळकुटी, बेल्हे, कांदळी, वडगाव, माळवाडी, सावरगाव घुले, कासारे, कळस येथून आलेल्या पालख्यांची मिरवणूक निघेल.

दुपारी 12 वाजता छबिना मंदिराच्या पायर्यांवर येऊन पालख्याच्या मिरवणुकीची सांगता होईल. हा सोहळा भाविकांच्या डोळ्यांची पारणे फेडणारा असतो. दुपारी 1 वाजता बेल्हा व ब्राह्मणवाडा येथून आलेल्या मानाच्या काठ्यांची मिरवणूक सुरू होईल. यात्रोत्सवासाठी देवस्थानच्या अध्यक्षा शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, विश्वस्त अ‍ॅड पांडुरंग गायकवाड, राजेंद्र चौधरी, खजीनदार तुकाराम जगताप, जालिंदर खोसे, कमलेश घुले, अशोक घुले, चंद्रभान ठुबे, सुवर्णा घाडगे, सुरेश फापाळे, रामदास मुळे, महादेव पुंडे, धोंडीभाऊ जगताप, दिलीप घुले आदी परिश्रम घेत आहेत.

Back to top button